नवी दिल्ली : विमान प्रवासाप्रमाणे ट्रेनमध्ये मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेण्यासाठी अतिरिक्त पैसे आकारले (Indian Railways Extra Fare) जातील का? असा काही नवीन नियम आला आहे का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी अशा बातम्यांचे खंडन केले आहे आणि ते चुकीचे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, दिवाळी आणि छठ पूजेदरम्यान रेल्वे बिहारसाठी 12000 हून अधिक रेल्वे गाड्यांची सेवा चालवेल, असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.
अलीकडेच बातम्या आल्या होत्या की, विमानात ज्याप्रमाणे अतिरिक्त सामान वाहून नेण्यासाठी प्रवाशाला जास्त पैसे खर्च करावे लागतात, त्याचप्रमाणे आता भारतीय रेल्वेही जास्त सामान (luggage in the train) वाहून नेण्यासाठी पैसे आकारेल.
हेही वाचा - Ration Card Cancellation: 1.25 कोटी रेशनकार्ड रद्द होणार? केंद्राचा राज्यांना अल्टिमेटम!
एका वृत्तसंस्थेशी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "खोट्या बातम्या चालवल्या जात आहेत. ट्रेनमध्ये किती वजन वाहून नेले जाऊ शकते, याचा नियम अनेक दशकांपासून आहे. कोणीतरी तोच जुना नियम धरून पुन्हा बातमी दिली. पण याचा अर्थ असा नाही की, त्यापेक्षा जास्त शुल्क आकारले जाईल.' अहवालात दावा करण्यात आला होता की, प्रथम श्रेणी एसीमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 70 किलोपर्यंत सामान वाहून नेण्याची परवानगी असेल. दुसऱ्या श्रेणी एसीमध्ये 50 किलो आणि नंतर थर्ड एसी आणि स्लीपर क्लाससाठी 40 किलोची मर्यादा निश्चित केली जाईल. त्याच वेळी, सामान्यतः म्हणजेच दुसऱ्या श्रेणीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त 35 किलो सामान वाहून नेण्याची परवानगी असेल. जर प्रवाशांनी ट्रेनमध्ये जास्त सामान सोबत नेले तर, त्यांना अतिरिक्त रक्कम मोजावी लागेल. हा निर्णय विमानातून प्रवास करताना होणाऱ्या गोष्टींसारखाच असेल. यासंबंधीच्या बातम्या फिरत होत्या. मात्र, हा नियम पूर्वीचाच असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
दिवाळी-छठनिमित्त बिहारसाठी 12000 रेल्वे सेवा
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी सांगितले की, दिवाळी आणि छठनिमित्त गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने या काळात 12000 हून अधिक रेल्वे सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, खासदार संजय झा आणि खासदार डॉ. संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत त्यांनी ही घोषणा केली. बिहारमधील या नेत्यांनी रेल भवन येथे वैष्णव यांची भेट घेतली.
हेही वाचा - रेल्वेची प्रवाशांना खास दिवाळी भेट! परतीच्या प्रवासावर मिळणार तब्बल 20 टक्के सूट