Thursday, August 21, 2025 02:56:04 AM

Non-Veg Milk: अमेरिकेचा भारतात ‘नॉन-व्हेज मिल्क’ विकण्याचा प्रयत्न; नेमकं काय आहे हे दूध?

अमेरिकेच्या डेअरी गायींना मांसयुक्त आहार दिल्याने त्यांच्याकडून मिळणारे दूध 'नॉन-व्हेज मिल्क' म्हणून ओळखले जाते. भारतीय संस्कृतीत मात्र शाकाहारी दूधच स्वीकारले जाते.

non-veg milk अमेरिकेचा भारतात ‘नॉन-व्हेज मिल्क’ विकण्याचा प्रयत्न नेमकं काय आहे हे दूध

Non-Veg Milk: भारतात दूधाला केवळ पोषणाचा स्रोत म्हणूनच नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. सकाळचा दिवस दूधाशिवाय पूर्ण होत नाही असं आपल्याकडे मानलं जातं. त्याचप्रमाणे अनेक धार्मिक विधींमध्येही दूधाचा वापर अनिवार्य असतो. परंतु अलीकडे ‘नॉन-व्हेज मिल्क’ या संकल्पनेची चर्चा जोर धरत आहे. विशेषतः भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार चर्चेमुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले आहे.

असे काय वेगळे आहे या ‘नॉन-व्हेज मिल्क’मध्ये, जे भारतातल्या पारंपरिक दुधापेक्षा वेगळं आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे.

नॉन-व्हेज मिल्क म्हणजे नेमके काय?

दूध म्हटले की आपल्याला लगेच शाकाहारी पदार्थ आठवतो. कारण भारतात दूध हे शाकाहारी म्हणूनच मानले जाते. मात्र अमेरिकेत आणि काही इतर देशांमध्ये प्रचलित असलेली एक वेगळीच पद्धत चर्चेत आहे.

अमेरिकेत काही डेअरी फार्ममध्ये गायींना वजन वाढवण्यासाठी आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी जनावरांपासून तयार केलेले खाद्य दिले जाते. यात प्राण्यांच्या हाडांचे चूर्ण, मासे किंवा मांसप्राप्त घटक मिसळलेले खाद्य असते. अशा प्रकारे पोसलेल्या गायींकडून मिळणारे दूध ‘नॉन-व्हेज मिल्क’ म्हणून ओळखले जात आहे.

भारतीय दुधापासून कसं आहे वेगळं?

भारतामध्ये गायींना मुख्यतः शाकाहारी खाद्य दिले जाते, जसे की कोरडे गवत, हिरवा चारा, चोकर, खळी, मका व इतर धान्य. त्यामुळे भारतात मिळणारे दूध हे ‘शुद्ध शाकाहारी’ मानले जाते. दुसरीकडे, परदेशात  विशेषतः अमेरिका, ब्राझील, युरोप, जपान यांसारख्या देशांमध्ये गायींना प्रथिनयुक्त आहार देण्यासाठी मांस किंवा हाडांपासून तयार खाद्य देण्याची पद्धत सर्रास आहे.

नॉन-व्हेज दूध म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक?

वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, अशा गायींचे दूध पोषणाच्या दृष्टीने सुरक्षित मानले जाते. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की, अशा दुधामुळे थेट आरोग्यावर वाईट परिणाम होत नाही. परंतु भारतात याला धार्मिक भावना आणि सांस्कृतिक मूल्ये जोडलेली असल्याने, इथल्या ग्राहकांना ते स्वीकार्य वाटेलच असे नाही. भारतीय समाजामध्ये ‘शुद्ध’ अन्नाची संकल्पना खूप महत्त्वाची असल्यामुळे, नॉन-व्हेज मिल्कचा स्वीकार होणं कठीण आहे.

भारतीय बाजारपेठेतील परिस्थिती

सध्या भारतात अनेक डेअरी ब्रँड्स हे '100% शाकाहारी आहारावर पोसलेली गाय अशा लेबलसह दूध विकतात.' गोशाळांमध्ये तयार होणारे दूध अधिक प्रमाणात विश्वासार्ह मानले जाते.  भारतीय ग्राहकांसाठी फक्त पोषणमूल्येच नव्हे तर त्यामागचे उत्पादन तंत्रही महत्त्वाचे असते. त्यामुळे नॉन-व्हेज मिल्क भारतात सहजपणे स्वीकारले जाईल, अशी शक्यता कमी आहे.

अमेरिकेचा उद्देश आणि भारतीय ग्राहकांची चिंता

अमेरिकेचा उद्देश भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये आपले डेअरी उत्पादन विकणे आहे. मात्र भारतीय ग्राहकांसाठी हे केवळ व्यापार नाही, तर श्रद्धेचा आणि संस्कृतीचा भाग आहे. गायींना मांसाहारी आहार दिला जात असल्याने, त्यांच्याकडून मिळणारे दूध भारतीय धार्मिक भावनांशी विसंगत आहे. त्यामुळे अमेरिकेचा हा प्रयोग भारतीय ग्राहकांच्या विश्वासाला धक्का देणारा ठरू शकतो. नॉन-व्हेज मिल्क हे केवळ पोषणाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यात फारसा धोका नाही. पण भारतात याचा स्वीकार करणे कठीण आहे, कारण येथे दूध हे धार्मिक, सांस्कृतिक आणि भावनिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे आहे.

म्हणूनच अमेरिकेचा नॉन-व्हेज मिल्क भारतात विकण्याचा प्रयत्न केवळ व्यापारापुरता मर्यादित राहणार नाही, तर त्यात श्रद्धा, परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास यांचा देखील मोठा भाग असणार आहे. भारतासाठी यावर योग्य तो विचार करणे आणि ग्राहकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.


सम्बन्धित सामग्री