आग्रा: सोशल मीडियावर लाईव्ह-स्ट्रीमिंग केल्यानंतर आग्रा येथील एका आयटी फर्मच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. मृताच्या वडिलांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. मृत व्यक्ती आणि त्याच्या पत्नीमधील ताणलेल्या संबंधांचा या लाईव्ह-स्ट्रीममध्ये उल्लेख आहे.
या व्यक्तीने आत्महत्या करण्यापूर्वी लाईव्ह व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये, त्या व्यक्तीने आपल्या आत्महत्येसाठी आपल्या पत्नीला जबाबदार धरले.
डीसीपी आग्रा सूरज राय म्हणाले, '27 फेब्रुवारी 2025 रोजी सोशल मीडियाद्वारे आमच्या माहितीत एक व्हिडिओ आला, ज्यामध्ये एक व्यक्ती आत्महत्या करण्यापूर्वी लाईव्ह बोलत होता. व्हिडिओची दखल घेत, तक्रारीसंदर्भात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व तथ्ये आणि आरोपांची चौकशी केली जाईल आणि पुराव्याच्या आधारे कारवाई केली जाईल.'
सदर परिसरातील डिफेन्स कॉलनीतील रहिवासी असलेला पीडित मानव शर्मा एका आयटी फर्ममध्ये रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. मृताच्या वडिलांनी आग्रा येथील सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेही वाचा - School Blast: विद्यार्थी की गुन्हेगार? शाळेतील शौचालयात घडवून आणला स्फोट; चौथीची मुलगी जखमी, कारण समजल्यावर सगळे हादरले
एफआयआरमध्ये म्हटले आहे की, 'अर्जदार नरेंद्र कुमार शर्मा हे आग्रा येथील सदर बाजार पोलीस ठाण्यातील डिफेन्स कॉलनीचे रहिवासी आहेत. अर्जदाराचा मुलगा मानव शर्मा यांनी 1 जानेवारी 2024 रोजी हिंदू रितीरिवाजांनुसार आग्रातील एका मुलीशी हुंडा न घेता लग्न केले. लग्न झाल्यापासून, सून निकिता अर्जदाराच्या मुलाशी आणि कुटुंबातील इतर सदस्यांशी चांगले वागत नव्हती. ती लहानसहान गोष्टींवरून चिडायची आणि घरात भांडणे करू लागायची.'
एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे की, मानव शर्मा मुंबईत काम करत होता, म्हणून तो त्याच्या पत्नीला सोबत मुंबईला घेऊन गेला, जिथे पत्नी त्याच्याशी दररोज भांडत असे आणि अर्जदाराच्या मुलाला उघडपणे धमकी देत असे की, ती आत्महत्या करून मरेल आणि त्याला त्या प्रकरणात अडकवेल.
'नरेंद्र कुमार यांचा मुलगा या कटकटींमुळे वैतागला होता, त्याने फोनवर अनेक वेळा सुनेच्या अशा वागण्याबद्दल सांगितले. त्यानंतर वडिलांनी त्याला समजावून सांगितले की, लग्न नुकतेच झाले आहे आणि सर्व काही ठीक होईल," असे एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे.
अर्जदाराने म्हटले आहे की, सुनेच्या वागण्यात कोणतीही सुधारणा झाली नाही आणि ती त्याच्या मुलाला त्याच्यासोबत राहत असताना मानसिक त्रास देत राहिली, ज्यामुळे अर्जदाराचा मुलगा नैराश्याचा बळी ठरला.
'अर्जदार नरेंद्र कुमार यांचा मुलगा 23 फेब्रुवारी 2025 रोजी त्याच्या पत्नीसह मुंबईहून आग्र्याला आला आणि त्याच दिवशी तो त्याच्या पत्नीच्या आग्रा येथील माहेरी गेला. तिथे तिच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचा अपमान केला आणि त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. अर्जदाराचा मुलगा हे सर्व सहन करून घरी परतला. 24 फेब्रुवारी रोजी मानवने गळफास घेऊन आत्महत्या केली,' असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.
अर्जदाराने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली आणि मुलगा मानव यांना उपचारासाठी आग्राच्या लष्करी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा - Mahakumbh Mela 2025 : 'आई कुंभमेळ्यात हरवली', हे ऐकताच मुलगा थेट पोहोचला प्रयागराजला; अन् बापाचं भयंकर कृत्य उघडकीस!
दरम्यान, या प्रकरणी मानवची पत्नी निकिता शर्मा हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये आपल्यामुळे पती मानव याला त्रास झाला, याबद्दल तिने मृत पतीची माफी मागितली आहे. तसेच, स्वत:ही अशा प्रकारचे आत्महत्येसारखे पाऊल उचलल्यास कोणालाही दोषी मानण्यात येऊ नये, असे तिने म्हटले आहे.