EPFO 3.0: देशातील सुमारे आठ कोटी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) सदस्यांसाठी या वर्षीची दिवाळी अधिक आनंदाची ठरणार आहे. केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी व्यवस्थापनात मोठे बदल करण्याची तयारी सुरू असून, याला ईपीएफओ 3.0 असे नाव दिले गेले आहे. या बदलांमुळे सामान्य कर्मचारीवर्गाला बँकेसारख्या आधुनिक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
नवे बदल काय असतील?
ईपीएफओ 3.0 अंतर्गत पीएफ खात्याला बँक खात्यासारखी सुविधा मिळू शकते. म्हणजेच सदस्यांना त्यांच्या निधीवरील व्यवहारांसाठी एटीएम किंवा यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढणे किंवा इतर ट्रान्झॅक्शन करणे शक्य होईल. आतापर्यंत पीएफ काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया किंवा ऑनलाइन क्लेम सिस्टीम वापरावी लागत होती. पण या सुधारणा राबवल्यानंतर प्रक्रिया खूप सोपी आणि ग्राहकाभिमुख होईल.
हेही वाचा: ITR फाइल करण्यास उरले फक्त तीन दिवस ; अन्यथा भरावा लागेल दंड
बैठकीत होणार निर्णय
कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 10-11 ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत ईपीएफओ 3.0 सुविधा राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यासंदर्भात निर्णय होऊ शकतो. जर हा निर्णय झाला, तर देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी ही क्रांतिकारी पाऊल ठरेल.
पेन्शन वाढीवरही विचार
फक्त पीएफ व्यवहारच नव्हे, तर पेन्शनधारकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. कर्मचारी संघटनांकडून सातत्याने पेन्शन वाढवण्याची मागणी होत आहे. सध्या किमान पेन्शन 1,000 रुपये प्रतिमहिना आहे. पण नवी योजना मंजूर झाल्यास ती 1,500 ते 2,500 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या जगण्याचा स्तर सुधारण्याची अपेक्षा आहे.
दिवाळीपूर्वी मोठं गिफ्ट
अलीकडेच सरकारने जीएसटी सुधारणा करून ग्राहकांना महागाईपासून काही प्रमाणात दिलासा दिला होता. त्यानंतर दिवाळीपूर्वी आणखी एक सकारात्मक बातमी देण्यासाठी केंद्र सज्ज झाले आहे. या बदलामुळे नोकरदार वर्गाच्या हातात अधिक तरलता येईल, तसेच पैशांच्या अडचणींवर सोपा पर्याय उपलब्ध होईल.
भविष्यातील दिशा
डिजिटल व्यवहारांच्या युगात पीएफ खात्यांनाही आधुनिक बँकिंगची जोड मिळणे ही मोठी पायरी ठरेल. यामुळे केवळ कर्मचारीच नव्हे तर संपूर्ण प्रणाली पारदर्शक आणि गतिमान होईल. तज्ज्ञांच्या मते, ईपीएफओ 3.0 लागू झाल्यानंतर नोकरदारांना त्वरित सुविधा मिळेल, तर संघटनेच्या विश्वासार्हतेतही वाढ होईल.