Aishwarya Rai Bachchan: बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या नावाचा, छायाचित्रांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा व्यावसायिक गैरवापर थांबवण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तिचा आरोप आहे की काही एआय-जनरेटेड व बनावट छायाचित्रे कॉफी मग, टी-शर्ट्स, पेयपदार्थ आणि इतर उत्पादनांवर छापून विकली जात आहेत. इतकेच नव्हे, तर काही डिजिटल प्लॅटफॉर्मवर तिची खोटी अधिकृत व्यासपीठे तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळे लोकांची दिशाभूल होत आहे.
न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने आज या प्रकरणाची प्राथमिक सुनावणी केली. न्यायालयाने तोंडी संकेत दिला की प्रतिवादींना रोखण्यासाठी अंतरिम मनाई आदेश जारी केले जातील. न्यायालयाने नमूद केले की उल्लंघनाची व्याप्ती मोठी असल्याने प्रत्येक प्रतिवादीविरुद्ध स्वतंत्र आदेशही पारित करावे लागू शकतात. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
हेही वाचा - Sanjay Kapur Property Dispute: करिश्मा कपूरच्या मुलांची 30 हजार कोटींच्या मालमत्तेसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
ऐश्वर्याच्या वतीने वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, अभिनेत्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे. उदाहरण देताना त्यांनी नेशन वेल्थ नावाच्या कंपनीचा उल्लेख केला, ज्यांनी ऐश्वर्याला त्यांच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये अध्यक्ष म्हणून दाखवले होते. प्रत्यक्षात तिचा या कंपनीशी कोणताही संबंध नव्हता. सेठी यांनी याला स्पष्ट फसवणूक ठरवले.
हेही वाचा - Aly Goni Controversy: 'मी मुस्लीम आहे म्हणून...'; अली गोनीने सांगितलं ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलण्यामागचे कारण
दरमयान, सेठी यांनी 2023 मधील अनिल कपूर प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, व्यक्तिमत्त्व अधिकारांचे संरक्षण हा कायदेशीरदृष्ट्या मान्यताप्राप्त हक्क आहे. त्यानुसार कोणत्याही व्यक्तीच्या परवानगीशिवाय तिच्या प्रतिमा, नाव किंवा व्यक्तिमत्त्वाचा व्यावसायिक उपयोग करता येणार नाही. तथापी, गुगलच्या वतीने वकील ममता राणी यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केले की विशिष्ट सामग्री काढून टाकण्यासाठी तक्रारदाराने संबंधित URL प्रदान करावे लागतील. न्यायालयाने सुचवले की याचिकाकर्ता विशिष्ट URL सादर करू शकतो किंवा ब्लॉकिंग अँड स्क्रीनिंग इन्स्ट्रक्शन (BSI) प्रक्रियेचा वापर करू शकतो.