Rabi Laxmi Burnt Alive: नेपाळमध्ये राजकीय संकट आणि भ्रष्टाचाराविरोधातील संताप यामुळे हिंसक निदर्शने शिगेला पोहोचली आहेत. आज पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर निदर्शकांनी अनेक मंत्र्यांच्या घरांना आग लावली. काठमांडूमध्ये निदर्शकांनी मंगळवारी माजी पंतप्रधान झलनाथ खनाल यांचे घर जाळले. त्यावेळी त्यांच्या पत्नी रबी लक्ष्मी चित्रकर घरात होत्या. गंभीर भाजल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ही घटना सोशल मीडिया बंदी आणि भ्रष्टाचारविरोधी चळवळीदरम्यान घडली आहे. निदर्शकांनी संसद, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे निवासस्थान, तसेच इतर सरकारी आस्थापनांवर हल्ले चढवले. तथापी, अर्थमंत्री बिष्णू प्रसाद पौडेल यांना रस्त्यावर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे.
हेही वाचा - Nepal Gen- Z Protest: वातावरण चिघळलं! पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या निवासस्थानी जाळपोळ; आंदोलकांनी नाचगाणी करत साजरा केला आनंद
सरकारने काही दिवसांपूर्वी फेसबुक, एक्स (ट्विटर), यूट्यूब यांसारख्या प्लॅटफॉर्मना नोंदणी व देखरेखीखाली आणण्याचा आदेश दिला होता. यामुळे संतप्त तरुणांनी 'जनरल झेड निषेध' नावाने मोठे आंदोलन उभे केले. पोलिसांनी कारवाई करताना गोळीबार केला ज्यात 19 निदर्शकांचा मृत्यू झाला.
हेही वाचा - Nepal Gen Z Protest: नेपाळमध्ये सत्तापालटाचे संकट! 3 मंत्र्यांच्या राजीनाम्यांनंतर पंतप्रधान ओली अडचणीत
हिंसा भडकताच निदर्शकांनी विमानतळ बंद केले. तसेच संसद भवनावर हल्ला केला. त्यानंतर मंत्र्यांना लष्करी हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. दरम्यान, राजीनामा देताना ओली यांनी जाहीर केले की ते तत्काळ प्रभावाने पद सोडत आहेत. मात्र, परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असून नेपाळ गंभीर राजकीय अशांततेच्या गर्तेत सापडले आहे.