श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये दरवर्षी होणारी अमरनाथ यात्रा यंदा नियोजित वेळेपेक्षा आठवडाभर आधीच स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी समाप्त होणार होती, मात्र अविरत पावसामुळे खराब झालेल्या मार्गांमुळे यात्रा रविवारीच बंद करण्यात आली. खराब हवामान, मार्गांची असुरक्षित स्थिती आणि महत्वाच्या दुरुस्तीच्या कामांमुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला.
रक्षाबंधनाआधीच यात्रा थांबवण्याचा निर्णय -
3 जुलै रोजी सुरू झालेली ही पवित्र यात्रा 9 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी समाप्त होणार होती. मात्र, अविरत पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे यात्रा नियोजित वेळेपूर्वीच 3 ऑगस्टपासून बंद करण्यात आली आहे. काश्मीर विभागीय आयुक्त विजय कुमार बिधुरी यांनी सांगितले की, बालटाल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवर गंभीर नुकसान झाले आहे. दुरुस्ती आणि देखभाल कामासाठी वेळ अपुरा आहे. त्यामुळे यात्रा तातडीने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा - Operation Akhal: जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या दिवशीही ऑपरेशन अखल सुरू; 2 दहशतवाद्यांचा खात्मा
यंदा 4.10 लाख भाविकांनी घेतले दर्शन
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, यावर्षी आतापर्यंत 4,10,000 हून अधिक भाविकांनी अमरनाथ येथील बाबा बर्फानी यांचे दर्शन घेतले आहे. मात्र ही संख्या मागील वर्षीच्या 5,10,000 च्या तुलनेत थोडी कमी आहे.
बिधुरी यांनी स्पष्ट केले की, मार्गांवर सतत यंत्रसामग्री आणि कामगार तैनात असूनही, मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. अशा परिस्थितीत यात्रेला पुन्हा सुरू करणे शक्य नाही.
हेही वाचा - गोंडामध्ये बोलेरो कार कालव्यात पडली; एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू
हवामान आणि सुरक्षेची दृष्टीकोन -
यात्रा सुरक्षित ठेवण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला गेला होता. मात्र, हवामानात कोणतीही सुधारणा न झाल्याने आणि दोन्ही मार्गांवर सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे, पुढील धोका टाळण्यासाठी यात्रा स्थगित करण्यात आली आहे.