नवी दिल्ली - सध्या भारत आणि अमेरिकेदरम्यान अशी स्थिती झाली आहे की, संघर्ष आणि व्यापार एका वेळी समोरासमोर उभे राहिले आहेत. प्रेम आणि व्यवसाय एकत्र येऊ नयेत, असे म्हटले जाते. परंतु, सध्या तर एकीकडे ट्रम्प टॅरिफमुले ताणलेले संबंध आणि व्यापाराची गरज अशा स्थितीत दोन्ही देश सापडले आहेत. येत्या काळात भारत आणि अमेरिकेदरम्यान संरक्षण करारावर चर्चा सुरू आहे. पण या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा स्वर थोडासा नरमाईचा झाला असला तरी 50 टक्के टॅरिफमुळे निर्माण झालेला तणावही शिगेला पोहोचला आहे.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाची एक टीम आणि बोईंग कंपनीचे उच्च अधिकारी पुढील आठवड्यात भारतात येत आहेत. येथे सुमारे 4 अब्ज डॉलर्सच्या (सुमारे 35 हजार कोटी रुपये) पाळत ठेवणाऱ्या विमानांच्या (India US Patrol Jet Deal) करारावर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीमुळे दोन्ही देशांमधील रखडलेल्या व्यापार चर्चा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चर्चेचा अजेंडा एकूण 6 पी-8आय (P-8i) नौदल गस्त विमानांच्या खरेदीवर केंद्रित असेल. या कराराला 2019 मध्ये हिरवा कंदील मिळाला होता. पण त्यानंतर चर्चा अडकली. भारताने यापूर्वी 2009 मध्ये 8 पी-8आय विमाने आणि 2019 मध्ये आणखी 4 विमाने खरेदी केली होती. हा ताफा तामिळनाडूमधून चालवला जातो आणि हिंद महासागर प्रदेश आणि सागरी मार्गांवर लक्ष ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
हेही वाचा - CP Radhakrishnan Oath Ceremony : सी पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
ट्रम्प यांच्या विधानानंतर आशा निर्माण झाली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की, अमेरिका भारतासोबत व्यापार चर्चा पुन्हा सुरू करत आहे आणि ते लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलतील. यापूर्वी ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादला होता. भारत रशियाकडून तेल खरेदी करून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्धाला निधी देतआहे, असे सांगत त्यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले होते. मात्र, भारताने असा कर लावणे अन्याय्य, अयोग्य असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली होती. तसेच, अमेरिकेसमोर झुकण्यास नकार दिला होता.
रशियाकडून आयात कमी झाली, अमेरिकेसोबत सहकार्य वाढले
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, भारताच्या शस्त्रास्त्र आयातीत रशियाचा वाटा गेल्या वर्षी 36 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे, तर 2009 मध्ये तो 76 टक्के होता. याउलट, 2018 पासून भारताने अमेरिकेसोबत सुमारे 20 अब्ज डॉलर्सचे संरक्षण करार केले आहेत. गेल्या वर्षीच भारताने अमेरिकन कंपनी जनरल अॅटॉमिक्सकडून 3 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे 31 ड्रोन खरेदी करण्याचा करार केला होता.
संबंधांमध्ये नवीन संतुलन साधण्याचा प्रयत्न
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, पी-8आय पाळत ठेवणाऱ्या विमानांच्या करारामुळे भारत-अमेरिका संबंधांना नवी बळकटी मिळू शकते. एकीकडे, भारत रशियावरील आपले अवलंबित्व कमी करत आहे, तर दुसरीकडे, अमेरिका भारतासोबत संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारी वाढवून आशियातील आपले वर्चस्व मजबूत करू इच्छित आहे.
हेही वाचा - GST Cut : जीएसटी कपातीने ऑटो कंपन्यांचे खिसे भरले; मात्र, दुचाकी, चारचाकी आणि इतर संबंधित डीलर्स अडचणीत