मुंबई : मुंबईकरांनी शनिवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर चौदाशे कोटी रुपयांची सोन्याची खरेदी केली. मागील वर्षीपेक्षा वजनात ४० टक्के वृद्धी नोंदवली गेली. मूल्यात दुपटीने वाढ नोंदवली गेली.
मुंबईतील झवेरी बाजार हे सराफा बाजाराचे केंद्र आहे. देशातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त सोन्याची उलाढाल झवेरी बाजारातून होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईकरांनी सुमारे १६५० किलो सोन्याची खरेदी केली. लवकरच विवाह समारंभ असल्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. मुंबईत २०२३ च्या दसऱ्याला बाराशे किलो सोन्याची खरेदी झाली. त्यावेळी प्रतितोळे सोन्याचा दर अर्थात दहा ग्रॅम सोन्याचा दर ६५ हजार ८०० रुपये होता. तर २०२४ मध्ये मुंबईत दसऱ्याला १६५० किलो सोन्याची खरेदी झाली. यावेळी प्रतितोळे सोन्याचा दर अर्थात दहा ग्रॅम सोन्याचा दर ७७ हजार ८०० रुपये होता.