मुंबई : ओबीसी समाजाच्या हक्कावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली. मंत्रीपद न मिळाल्यामुळे आणि राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित न राहिल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ हे भाजपच्या मोठ्या नेत्यांची भेट घेत आहेत. भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत ओबीसी समाजाच्या हिताबाबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नुकसान होऊ देणार नाही, असे ठाम आश्वासन दिले. “ओबीसी नाराज आहेत, हे मला कळतंय,” असं ते म्हणाले.
काय म्हणाले भुजबळ - आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समीर भुजबळ आणि मी भेट घेतली. या बैठकीत अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर चर्चा करण्यात आली. खासकरून ओबीसी समाजाच्या कल्याणाबाबत सखोल विचारविनिमय झाला असून या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे आश्वासन दिले. ओबीसींच्या हक्कांचे रक्षण करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
छगन भुजबळ यांनी पुतण्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शासकीय निवास्थान सागर बंगल्यावरील बैठकीत ओबीसी समाजाच्या हक्कांवर चर्चा केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसींच्या नुकसानापासून त्यांना वाचवण्यासाठी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. भुजबळ आणि मी ओबीसी समुदायाच्या नुकसानापासून वाचवण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ओबीसींचे नुकसान होऊ द्यायचे नाही आणि यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय घेतले जातील. "आता वातावरण वेगळं आहे, मात्र ८-१० दिवसांची वेळ द्या, त्यानंतर एक ठोस मार्ग काढू," असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ओबीसींविषयी चांगले निर्णय घेण्यासाठी सखोल चर्चा करण्यात आली असून, ओबीसी समाजाच्या भल्यासाठी आपण एकसाथ कार्य करू, हे त्यांनी ठरवले आहे.
हे देखील वाचा : २४ डिसेंबरपासून ओबीसी समाज उतरणार रस्त्यावर
छगन भुजबळ यांची नाराजी महाराष्ट्रात अद्याप मिटलेली नाही. यावर तोडगा न निघाल्यास, भुजबळ लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. सध्या भुजबळ "वेट अँड वॉच"च्या भूमिकेत आहेत. ओबीसी समाजाच्या मुद्द्यांवर आणि राजकीय समीकरणांवर तोडगा काढण्यासाठी पुढील निर्णय घेतला जाईल. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.