Sunday, August 31, 2025 07:03:42 AM

D Mart साहित्य स्वस्त मिळतं.. पण एका शेअरची किंमत आहे हजारांमध्ये! कशी केली इतकी प्रगती?

नव्याने विकसित होणाऱ्या शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, डीमार्ट सगळीकडे आहे. डीमार्टची ओळख इतकी वाढली आहे की, स्वस्त वस्तू म्हणजे डीमार्ट, असंच मानलं जातं. जाणून घेऊ, कसं आहे याचं बिझिनेस मॉडेल..

d mart साहित्य स्वस्त मिळतं पण एका शेअरची किंमत आहे हजारांमध्ये कशी केली इतकी प्रगती

D Mart Success Story : सध्या विविध घरगुती लागणाऱ्या छोट्या-मोठ्या वस्तू, किराणा साहित्य, खेळणी, कपडे, किचनमधील वस्तू असे खूप काही डी मार्ट मिळत असल्याच्या अनुभव लोकांना आल्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी पाहायला मिळते. परवडणाऱ्या दरात शॉपिंगसाठी मध्यमवर्गीयांची डी मार्टला नेहमीच पसंती असते. इथले डिस्काऊंटही लोकांना आकर्षक वाटतात. डीमार्ट (DMart) संपूर्ण भारतात स्वस्त वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय, इथल्या वस्तूंची गुणवत्ताही लोकांच्या पसंतीला उतरत आहे.

नव्याने विकसित होणाऱ्या शहरांपासून ते मोठ्या शहरांपर्यंत, डीमार्ट सगळीकडे आहे. डीमार्टची ओळख इतकी वाढली आहे की, स्वस्त वस्तू म्हणजे डीमार्ट, असंच मानलं जातं. आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात सुद्धा डीमार्ट अनेक मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना टक्कर देत आहे. याचं कारण स्पष्ट आहे – इथे वस्तू खूप स्वस्त दरात मिळतात.

एक खास बाब म्हणजे ज्या भागात डीमार्ट उघडतं, तिथल्या जमिनीच्या किमती वाढायला लागतात. लोकांना वाटतं की डीमार्टने ज्या भागात गुंतवणूक केली आहे, त्या भागाचं भविष्य चांगलं असणार. डीमार्टच्या यशामागे ज्या व्यक्तीची बुद्धी आहे, ते आहेत राधाकिशन दमानी. दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला दमानी यांनाच आपले मार्गदर्शक मानत होते.

हेही वाचा - तुम्हाला श्रीमंत व्हायचंय का? 'हे' सोपे नियम फॉलो करा

राधाकिशन दमानी देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांची संपत्ती 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की राधाकिशन दमानी फक्त 12 वी पर्यंत शिकलेले आहेत. तरीही, आपल्या तल्लख बुद्धी आणि व्यावसायिक दृष्टिकोनाच्या बळावर आज ते अब्जावधींच्या संपत्तीचे मालक आहेत. दमानी एक काळचे शेअर बाजारातील मोठे खेळाडू आहेत. त्यांनी जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सुरुवातीला त्यांना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागला. 1999 मध्ये त्यांनी नेरुळमध्ये पहिली फ्रँचायझी घेतली, जी अयशस्वी झाली. यानंतर त्यांनी बोअरवेल बनवण्याचं काम सुरू केलं, पण हेही चाललं नाही.

डी मार्टचे बिझिनेस मॉ़डेल

2002 मध्ये त्यांनी मुंबईत पहिलं डीमार्ट स्टोअर उघडलं. त्यांनी सुरुवातीपासूनच ठरवलं होतं की, ते भाड्याच्या जागेत डीमार्ट स्टोअर उघडणार नाहीत. हो.. जिथे-जिथे डीमार्टची स्टोअर्स आहेत, त्या सर्व जागा डीमार्टच्या मालकीच्या आहेत. आज देशभरात डीमार्टचे 300 हून अधिक स्टोअर्स आहेत. याचा अर्थ राधाकिशन दमानी यांच्या मालकीचे केवळ डीमार्ट स्टोअर्सच नाहीत, तर भारतात 300 मोठ्या जमिनी सुद्धा आहेत. हे स्टोअर्स 11 राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

डीमार्ट स्टोअर्स ज्या ठिकाणी सुरू होते, त्या ठिकाणच्या जागांच्या किमती हळूहळू वाढू लागतात. शहरातील इतर ठिकाणच्या जागांच्या दरांच्या तुलनेत या किमती वेगाने वाढतात. या वाढलेल्या दराचा फायदाही डीमार्ट स्टोअर्ला होतो. म्हणजेच, डी मार्टच्या वार्षिक नफ्यामध्ये जागेचा वाढलेला दर हाही फायदाच असल्याप्रमाणे डीमार्टचे व्यवस्थापन विचार करते.

याशिवाय, स्वस्त वस्तू विकण्याचा प्रश्न आहे, त्याचा संबंध सुद्धा राधाकिशन दमानी यांच्या वैयक्तिक धोरणांशी आहे. डीमार्ट भाड्याच्या जागेत स्टोअर उघडत नाही, ज्यामुळे त्यांचा चालण्याचा खर्च खूप कमी होतो. ते स्वतःच्या जमिनीवर स्टोअर चालवतात, त्यामुळे त्यांना नियमित भाडं द्यावं लागत नाही. या बचतीचा फायदा ते ग्राहकांना स्वस्त वस्तू देऊन करतात. यामुळे ग्राहक येत राहतात. शिवाय, काही वस्तू फार स्वस्त नसतात, ज्या ग्राहक खरेदी करतात. यातही डीमार्टचा नफा असतो. तसेच, इथे आल्यानंतर असे क्वचितच होते, ज्यावेळेस ग्राहक जास्त किमतीची खरेदी करत नाही. कारण, डीमार्टमध्ये शॉपिंगसाठी ठेवलेल्या ट्रॉली भरभरून खरेदी ग्राहक करतात. यामुळे मोठ्या प्रमाणात विक्री होऊन डीमार्टची उलाढाल म्हणजेच, टर्नओव्हर वाढतो.

हेही वाचा - 'Hybrid Mutual Funds' शेअर्स आणि बाँड्सचा सर्वोत्तम मिश्र पर्याय; जाणून घ्या कसा असतो परतावा

डीमार्टमध्ये मिळणाऱ्या डिस्काऊंटचं गणित

डीमार्ट आपला स्टॉक 30 दिवसांच्या आत विकून टाकतो आणि नवीन वस्तूंची ऑर्डर देतो. यामुळे त्यांना मोठा डिस्काउंट मिळतो. लोकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंटपेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असू शकत नाही. डीमार्ट ज्या कंपन्यांकडून वस्तू खरेदी करतं, त्यांना त्वरित पैसे देतं. पैसे लगेच मिळत असल्यामुळे उत्पादक त्यांना आणखी डिस्काउंट देतात. डीमार्ट हा डिस्काउंट ग्राहकांना देतो किंवा स्वतःचा नफा वाढवण्यासाठी वापरतो. एकूणच, उत्पादक कंपनीकडून जो डिस्काउंट मिळतो, तो ग्राहकांना दिला जातो. ते स्वतःच्या खिशातून काहीही देत नाहीत. त्यांचा नफा आहे तेवढाच राहतो.

याशिवाय, काही कंपन्या आपल्या उत्पादनांना चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी डीमार्टला जास्त डिस्काउंट देतात किंवा थेट पेमेंट सुद्धा करतात. रॅक मध्ये खूप वर किंवा खूप खाली ठेवलेला माल सहसा ग्राहक बघत नाही किंवा खरेदी करत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर ठेवलेला माल त्यांना जास्त आकर्षित करतो. ही गर्दीची मानसिकता लक्षात घेऊन त्यानुसारही नफ्यासाठी प्लॅनिंग केली जाते. त्यामुळे एकूणच डीमार्ट आपल्या स्टोअरमधील चांगली जागा विकून पैसे कमावतं. डीमार्ट आपल्या खर्चात 5-7 टक्के बचत करतं आणि तो डिस्काउंटच्या रूपात ग्राहकांना देतं. याच कारणामुळे डीमार्ट आजही भारतातील सर्वात स्वस्त आणि विश्वासार्ह रिटेल चेन आहे. यामुळे डीमार्ट सुरू झाल्यापासून जसजशी याची चर्चा वाढू लागली आणि लोकांमधली विश्वासार्हता वाढू लागली, त्याच वेगाने डीमार्टच्या शेअर्सच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या.


सम्बन्धित सामग्री