DD Lapang Passes Away: मेघालयचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सर्वाधिक काळ राजकारणात सक्रिय राहिलेले माजी मुख्यमंत्री डी.डी. लपांग यांचे वयाच्या 91 व्या वर्षी शिलाँग येथील रुग्णालयात निधन झाले. प्राप्त माहितीनुसार, त्यांची प्राणज्योत 12 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी रात्री मालवली. लपांग यांचा जन्म 10 एप्रिल 1934 रोजी झाला होता. त्यांनी 1992 ते 2008 दरम्यान चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांचा राजकीय प्रवास 1972 मध्ये सुरू झाला, जेव्हा ते नोंगपोह मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवार म्हणून पहिल्या मेघालय विधानसभेत निवडून आले. त्यानंतर त्यांनी विविध मंत्रिपदे सांभाळली आणि आपला साधेपणा व लोकाभिमुख स्वभावामुळे सर्वपक्षीयांकडून आदर मिळवला.
मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याच्या प्रशासनाला बळकटी देणे, विकासात्मक कामांना गती देणे आणि सांप्रदायिक सलोखा राखणे यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले. मेघालयच्या युती-आधारित राजकारणात ते एकमत निर्माण करणारे नेते म्हणून ओळखले जातात.
हेही वाचा - PM Modi in Manipur : मणिपूरला 7,300 कोटी रुपयांची मदत; हिंसाचारबाधित कुटुंबांची पंतप्रधानांनी घेतली भेट
राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी रस्ते कामगार आणि शाळेतील उपनिरीक्षक म्हणून काम केले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या अडचणींशी त्यांचा घट्ट संबंध राहिला. सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही ते राज्यातील ज्येष्ठ आणि आदरणीय नेते म्हणून कार्यरत राहिले. 2024 मध्ये री-भोई जिल्ह्यात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले होते.
हेही वाचा - PM Modi In Manipur: 'मणिपूर भारतमातेच्या मुकुटावरील रत्न...'; इंफाळमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
डी.डी. लपांग यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड के. संगमा यांच्यासह ईशान्य भारतातील अनेक ज्येष्ठ नेते त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली वाहण्यासाठी येणार आहेत. लपांग यांनी तीन दशकांहून अधिक काळ मेघालयाच्या राजकीय प्रवासाला दिशा दिली.