Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहतोय. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घराघरांत सजावट, मोदक, ढोल-ताशांचा गजर सुरू आहे. बाप्पाचे आगमन झाल्यावर सगळ्यांत गोड क्षण म्हणजे ‘आरती’. भक्तिमय स्वरांनी घर आणि समाज वातावरण भारावून जाते. पण या आरती म्हणताना अनेकदा आपण नकळत चुका करतो. छोट्या वाटणाऱ्या या चुका आरतीच्या भावार्थावर आणि भक्तीच्या शुद्धतेवर परिणाम करतात.
हेही वाचा: Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या पूजेची तयारी करताय? चुकूनही विसरू नका 'हे' साहित्य; वाचा संपूर्ण यादी
गणेश आरतीत होणाऱ्या सामान्य चुका
‘सुखकर्ता दुःखहर्ता’ ही आरती जवळजवळ सगळ्यांना पाठ असते. तरीही अनेक जण काही शब्द चुकून उच्चारतात. उदाहरणार्थ –
- 'नुरवी पुरवी प्रेम' असे म्हटले जाते, पण योग्य शब्द आहे नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची.
- 'रत्नखचित करा' हा चुकीचा उच्चार असून बरोबर शब्द आहे रत्नखचित फरा.
- 'संकष्टी पावाव' असे म्हणतात, पण योग्य शब्द आहे संकटी पावावे.
- 'वक्रतुंड त्रिनेमा' असे न म्हणता वक्रतुंड त्रिनयना म्हणणे योग्य आहे.
या छोट्या चुका आरतीची लय, ताल आणि अर्थ बदलतात. भक्तिभाव जपताना योग्य उच्चार महत्त्वाचे आहेत.
इतर आरतीतील सामान्य चुका
गणपती आरतीबरोबरच इतर अनेक आरत्या देखील आपण म्हणतो. पण त्यातही गफलती आढळतात.
- ‘लवथवती विक्राळा’ हा शब्द चुकीने ‘लवलवती विक्राळा’ असा म्हटला जातो.
- ‘दीपज्योती नमोस्तुते’ ऐवजी अनेकदा ‘दीपकजोशी नमोस्तुते’ असे हास्यास्पद उच्चार होतात.
- ‘ओवाळू आरत्या कुरवंड्या येती’ याचा चुकीचा उच्चार ‘सुरवंटया येती’ असा केला जातो.
अशा चुका नकळत हास्यास्पद ठरतात, पण त्यामागे श्रद्धा कमी नसते. तरीसुद्धा योग्य शब्दांचा अभ्यास करूनच आरती म्हणणे हे अधिक भाविकतेचे द्योतक ठरते.
हेही वाचा:Ganesh Chaturthi 2025: 5 शुभ योगांचा अद्भुत संयोग; पाहा कोणत्या राशींवर बरसणार आहे बाप्पाची विशेष कृपा
का महत्त्वाचा आहे योग्य उच्चार?
आरती हा फक्त गाण्याचा भाग नाही तर देवाशी साधलेला भक्तिभावाचा संवाद आहे. शुद्ध शब्द आणि योग्य उच्चार आपली प्रार्थना अधिक प्रभावी बनवतात. चुकीचा उच्चार टाळला तर आरतीचा खरा भावार्थ उमगतो. शिवाय पुढील पिढीला योग्य परंपरा देण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
काय करावे?
- आरती म्हणण्याआधी तिचा योग्य शब्दार्थ आणि उच्चार शिकून घ्या.
- जर शंका असेल तर प्रामाणिक आरती पुस्तके किंवा विश्वसनीय स्त्रोतांचा आधार घ्या.
- मुलांना शिकवताना शब्दांची काटेकोर काळजी घ्या.
- प्रत्येकाने एकदा तरी योग्य उच्चारात आरती वाचून पाठ करावी.
हेही वाचा:Ganesh Chaturthi Wishes 2025: गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थी निमित्त प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा
गणरायावरचा आपला प्रेमभाव मनापासून असला तरी त्याची आराधना योग्य प्रकारे केली तर त्याचे महत्त्व अधिक वाढते. यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाची आरती म्हणताना योग्य शब्द, योग्य उच्चार आणि पूर्ण भक्तिभाव यांचा संगम साधा. बाप्पा मोरया!