भिवंडी: नायगाव परिसरातील अन्सारी अपार्टमेंटमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये छताचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या निष्पाप बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची आई गंभीर जखमी झाली आहे. ही दुर्घटना आज (28 मार्च) पहाटे घडली. घरात झोपलेल्या आई आणि बाळावर अचानक छताचे प्लास्टर कोसळले, त्यामुळे दोघेही गंभीररीत्या जखमी झाले. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला. आईवर अद्याप उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे भिवंडीतील धोकादायक इमारतींच्या देखभालीसंदर्भात प्रशासनाच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीतील अनेक इमारती जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहेत. वेळोवेळी तपासणी आणि दुरुस्ती न झाल्याने अशा दुर्घटना घडत आहेत. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करत धोकादायक इमारतींची त्वरित तपासणी करून सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जबाबदारी कोण घेणार?
एका निष्पाप बालकाचा मृत्यू आणि आईचा गंभीर जखमी होणे ही केवळ एक दुर्घटना नसून, प्रशासनाच्या निष्क्रीयतेचे गंभीर उदाहरण आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेने तत्काळ पावले उचलली नाहीत, तर भविष्यात आणखी किती निष्पाप जीव यामुळे गमवावे लागतील? प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, हा मोठा प्रश्न आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक रहिवाशांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 'आम्ही सुरक्षित आहोत का? महानगरपालिका फक्त कर वसुली करते, पण लोकांच्या सुरक्षिततेबाबत जबाबदारी घेणार का?' असे संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.