मुंबई : मुंबईत 14 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच पावसांचा जोर वाढला असून जागोजागी पाणी साचल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 3 तास मुंबई, उपनगर, रायगड, सोलापूर, ठाणे येथे 40-50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
हेही वाचा : Today's Horoscope 2025 : गुंतवणूक करणे 'या' राशीच्या लोकांसाठी ठरेल खूप फायदेशीर; जाणून घ्या
पावसाचा परिणाम रस्ते व रेल्वे वाहतुकीवर झाला असून मध्य तसेच पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीनं सुरू आहे. तर हवामान खात्यानं मुंबई, रायगड, पनवेलला आज यलो अलर्ट जारी केला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानं कामावर निघालेल्या मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटं उशीराने धावत असून कुर्ला परिसरात पावसाने पाणी साचले आहे.