मुंबई : जगनमोहन रेड्डी सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी मिसळली जात होती, असा गौप्यस्फोट आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला. हा गौप्यस्फोट करताना त्यांनी राष्ट्रीय डेअरीच्या प्रयोगशाळेचा अहवाल आंध्र सरकारकडे असल्याचेही सांगितले. तिरुपतीच्या लाडवांचा विषय सुरू असतानाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओद्वारे सिद्धिविनायकाच्या प्रसादाच्या पाकिटांवर चिमुकले उंदीर असल्याचा दावा करण्यात आला.
व्हिडीओत एका क्रेटमध्ये प्रसादाची पाकिटं दिसत आहेत. या पाकिटांसोबतच एका उघड्या पिशवीत उंदराची पिल्लं दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच सिद्धिविनायकाच्या प्रसादाच्या निर्मिती प्रक्रियेतील स्वच्छता या विषयावरील चर्चेला उधाण आले. या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया आली आहे. व्हायरल व्हिडीओत दिसत असलेली प्रसादाची पाकिटं सिद्धिविनायकाची नाहीत, असे सदा सरवणकर म्हणाले.