मुंबई : राज ठाकरेंनी मुंबईत शुक्रवारी मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात काय करू पेक्षा कसं करू यावर भर देण्यात आला आहे. मनसेच्या ब्ल्यू प्रिंटमधील अनेक विकासाचे मुद्दे जाहीरनाम्यातही आहेत. मराठी तरुणाईला नोकरीच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन देणार, सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती मराठीत आणि राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होतील यावर भर देणार अशी आश्वासने मनसेने जाहीरनाम्यातून दिली आहेत. महिला सुरक्षेला मनसेने जाहीरनाम्यात प्राधान्य दिले आहे. मनसेने जाहीरनाम्याच्या पुस्तिकेत काय करणार आणि कसं करणार हे सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मनसेच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे
अन्न, पिण्याचं पाणी, निवारा, महिला, कायदा सुव्यवस्था, आरोग्य, क्रीडा, बालसंगोपन, प्राथमिक शिक्षण आणि रोजगार, उच्च शिक्षण, औद्योगिक धोरण, प्रशासन आणि मराठीचा सन्मान, दळणवळण, वीज, पाण्याचं नियोजन, महाराष्ट्रभर रस्त्यांचे जाळे, घनकचरा व्यवस्थापन, मलनिःसारण, इंटरनेट उपलब्धता, पर्यावरण आणि जैवविविधता.