पावसाळा म्हटलं की नेटवर्कमध्ये नेहमीच गोंधळ असलेला बघायला मिळतो. अशातच आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेटवर्क अचानकपणे ठप्प झाले आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.सर्व्हर डाऊनमुळे अनेक खासगी हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा फटका बसत आहे. ही तांत्रिक अडचणू दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू असल्याचे समोर येत आहे.
या तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो, एयर इंडिया, अकासा, विस्तारा या विमान कंपन्यांना मोठा आर्थिक तसेच अन्य फटका बसत आहे. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विमानतळावर हळू हळू प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे आता हा तांत्रिक बिघाड दूर करून सर्व्हर पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
हा तांत्रिक बिघाड निदर्शनास येताच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रशासनाकडून ही अडचण दूर करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. विमानतळाची IT आणि कोअर टीमकडून नेटवर्क दुरुस्तीचे प्रयत्न सुरू आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाल्यामुळे चेक-इन व बोर्डिंगची संपूर्ण प्रक्रिया ‘मॅन्युअल मोड’वर वळवण्यात आली आहे. विमानतळावरील IT टीम नेमकी अडचण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच हा बिघाड दूर होऊन सर्व यंत्रणा पूर्ववत होईल, असे सांगितले जात आहेत.