नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेतील, ठोक मानधनावरील आणि परिवहन उपक्रमात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) जाहीर करण्याची लेखी मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त तसेच परिवहन व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रमाच्या आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता असल्याने कर्मचारी, अधिकाऱ्यांचे सानुग्रह अनुदान आचारसंहितेत अडकू नये म्हणून लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महापालिका आणि परिवहन विभागातील आस्थापनेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ४० हजार रुपये, ठोक मानधन, रोजंदारी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० हजार रुपये आणि तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षकांना २० ते २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान हवे आहे.