Monday, September 01, 2025 01:17:13 AM

बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास दया नायक करणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांची शनिवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक करणार आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास दया नायक करणार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांची शनिवारी हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास चकमकफेम पोलीस अधिकारी दया नायक करणार आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांपैकी एक जण हरियाणाचा आणि दुसरा उत्तर प्रदेशचा आहे. आणखी एकाचा शोध सुरू आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांकडून एक नऊ मिमी. चे पिस्तुल जप्त केले. या प्रकरणात हरियाणातील एका बड्या टोळीचा संबंध असल्याचा संशय व्यक्त होत आहे. बिश्नोई टोळीचा हत्येत हात असावा असा संशय व्यक्त होत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या वादातून बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बाबा सिद्दीकी यांच्यावर मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी छातीत लागल्याने गंभीर जखमी झालेल्या सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. गोळी लागून झालेल्या जखमेतून अती रक्तस्राव झाल्याने सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईच्या लिलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. ते पोलीस आणि डॉक्टरांकडून घटनेची माहिती घेत आहेत. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हे पण लिलावती रुग्णालयात पोहोचले आहेत.

भाजपाचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी घटनेची माहिती मिळताच तीव्र दुःख व्यक्त केले. अजित पवार घटनेची माहिती मिळताच मुंबईसाठी रवाना झाले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची माहिती मिळताच राजकीय वर्तुळातून तसेच बॉलिवूडमधून दुःखद घटना अशी प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. बाबा सिद्दीकी यांचे मनोरंजनसृष्टीतील अनेकांशी चांगले संबंध होते. यामुळे हत्येचे वृत्त येताच बॉलिवूडमधून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.


सम्बन्धित सामग्री