Satbara Utara New Changes : शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीवर त्यांचा हक्क कागदोपत्री स्पष्टपणे असणे महत्त्वाचे आहे. यामुळे भविष्याचे संरक्षण होणार आहे. यासंबंधीचे अत्यंत महत्त्वाचे पाऊल महसूल विभागाने उचलले आहे. महसूल विभागाने ‘जिवंत 7/12’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमीन नोंदीत पारदर्शकता आणण्यासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे. याच उद्देशाने विभागाद्वारे विशेषतः 18 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तींच्या नावासमोरील 'अ.पा.क.' (अज्ञान पालक कर्ता) शेरा हटवण्याची मोहीम राबवली जात आहे.
‘अ.पा.क.’ शेरा म्हणजे काय?
जेव्हा जमीन एखाद्याच्या नावावर असते आणि ती व्यक्ती वयाने 18 वर्षांखालील असते, तेव्हा कायद्याने ती ‘अज्ञान’ मानली जाते. अशावेळी त्या व्यक्तीच्या विश्वासातील सज्ञान व्यक्तीला ‘अज्ञान पालक कर्ता’ म्हणून जोडले जाते. या सज्ञान व्यक्तीचं नाव 7/12 उताऱ्यावर शेरा स्वरूपात नोंदवले जाते.
जेव्हा खातेदार 18 वर्षे पूर्ण करतो, तेव्हा त्या अज्ञान पालक कर्त्याचं नाव 7/12 वरून हटवून केवळ वास्तविक खातेदाराचे नाव ठेवणे आवश्यक असते. ही नोंद वेळेत न झाल्यास भविष्यात वाद निर्माण होऊ शकतो. अनेकदा असे प्रकार घडल्यामुळेच महसूल विभागाने हे पाऊल उचलले आहे. जमिनीचा खरा मालक असलेल्या शेतकऱ्याचा मालकीच्या जमिनीवर हक्क स्पष्ट असणे हे त्यांच्या भविष्याचे संरक्षण करणारे आहे. याच उद्देशाने महसूल विभागाने ‘जिवंत 7/12’ मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात जमीन नोंदीत पारदर्शकता आणण्यासाठी नवा उपक्रम सुरू केला आहे.
हेही वाचा - LIC New Scheme: महिलांसाठी एलआयसीची नवी योजना; दरमहा 7,000 रुपये कमवण्याची संधी
ही मोहीम कशा पद्धतीने चालवली जाईल?
महसूल विभागाने या प्रक्रियेस वेग देण्यासाठी जिवंत 7/12 मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या, तालुक्याच्या आणि गाव पातळीवर काम सुरू केले आहे. खातेदाराच्या वयाचा पुरावा जसे की, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, इत्यादी तपासून महसूल यंत्रणा ई-हक्क प्रणालीमार्फत अ.पा.क. शेरा हटवणार आहे. तहसील कार्यालयात हे पुरावे सादर करून नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहन महसूल विभागाने केलं आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.
नोंद करण्यासाठी कोणती माहिती व कागदपत्रे आवश्यक आहेत?
संबंधित जमीन व गावाची माहिती जसे की, जिल्हा, तालुका, गट नंबर, गावाचे नाव, खातेदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक व ई-मेल (जर असेल तर) आणि अज्ञान खातेदाराची जन्मतारीख
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
- ओळखपत्राची प्रत (आधारकार्ड, पॅन कार्ड इ.)
- शेतकऱ्यांना आवाहन
महसूल विभागाने स्पष्ट केले आहे की, "शेतकऱ्यांच्या जमिनीवरील हक्क स्पष्ट असणे ही आमची प्राथमिकता आहे." म्हणूनच 18 वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तींच्या नावासमोरील अ.पा.क. शेरा त्वरित हटवणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी तलाठी कार्यालयात संपर्क साधून वयाचा पुरावा दाखवावा, अ.पा.क. शेरा हटवून 7/12 अद्ययावत करून घ्यावा. यामुळे भविष्यातील मालमत्ता संदर्भातील वाद टाळता येतील.
हेही वाचा - मॅगी, नेस्कॅफेच्या चाहत्यांनो, लक्ष द्या.. नेस्ले त्यांच्या अमेरिकेतील खाद्यपदार्थांमधून कृत्रिम रंग पूर्ण हटवणार.. पण भारताचं काय?