Sunday, August 31, 2025 04:23:41 AM

'शरद पवार भाजपासोबत जाणार होते'

शरद पवार २०१६ मध्येच भाजपासोबत जाण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला.

शरद पवार भाजपासोबत जाणार होते

मुंबई : शरद पवार २०१६ मध्येच भाजपासोबत जाण्याच्या तयारीत होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक आशुतोष पाटील यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला. 

शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण केंद्रात राजीनामा जाहीर केला तेव्हा भविष्याचा आराखडा तयार होता. सुप्रिया यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचे ठरले. जर कोणी मला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर मी खुल्या चर्चेला तयार आहे; असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंपासून वेगळे झाले तेव्हाही जयंत पाटील आणि मुंब्य्रातील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या ५३ आमदारांनी भाजपाला पाठिंबा देऊन सत्तेत येण्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली होती. त्यावेळी आम्ही सत्तेत राहिलो असतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सांगितले.

अजित पवारांनी सकाळी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणे हा अपघात नव्हता. ती राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या पाठिंब्याने ठरवून केलेली कृती होती. शरद पवारांची या शपथविधीला सहमती होती. आम्ही गद्दार किवा घरफोडे नाही; असे तटकरेंनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी काम करत असलेल्या मनोज जरांगेंचा राजकीय विरोधकांनी गैरफायदा घेतला, असेही तटकरे म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस हे पाच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करणारे दुसरे नेते आहेत. त्यांनी मराठा आंदोलन यशस्वीपणे हाताळले आणि त्यांना ब्राह्मण म्हणून लक्ष्य करणे चुकीचे आहे; असे सुनिल तटकरे म्हणाले. महायुती सरकारच्या काळात अनेक विकासकामं झाली आहेत. राज्य प्रगतीपथावर आहे. यामुळे महायुती सरकार कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा सत्तेत येईल; असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी कधीही फोडाफोडीचे राजकारण केलेले नाही. 


सम्बन्धित सामग्री