छत्तीसगड : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीचा एक अनोखा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील "महतारी वंदन योजना" अंतर्गत सनी लिओनीच्या नावाने एक बनावट ऑनलाईन अकाऊंट उघडण्यात आलं आणि त्याद्वारे दर महिन्याला एक हजार रूपये जमा होऊ लागले. महाराष्ट्रातील धर्तीवर लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून ही योजना चालवली जात आहे, आणि त्या अंतर्गत फसवणूक करणाऱ्यांनी सनी लिओनीचे नाव वापरले आहे.
सनी लिओनीच्या खात्यावर दर महिन्याला पैसे जमा होणं सुरुवातीला कोणालाही संशयास्पद वाटलं नाही, मात्र लवकरच या फसवणुकीची शंका समोर आली. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई सुरू केली. संबंधित वेबसाईटवर तपास करताना सनी लिओनीच्या नावाने एक अकाऊंट उघडण्यात आले असून तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स म्हणून दाखवण्यात आले आहे. या बनावट अकाऊंटचा प्राथमिक तपास करतांना बस्तर जिल्ह्यातील तलूर सेक्टरच्या अंगणवाडी स्तरावर अर्ज नोंदवण्यात आल्याचं समोर आलं.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
वीरेंद्र जोशी नावाच्या व्यक्तीने सनी लिओनीच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून त्याच्याशी संबंधित खात्यातून बेकायदेशीरपणे पैसे काढले. या प्रकाराने प्रशासनात खळबळ माजली असून संबंधित आरोपीविरोधात एफआयआर नोंदवण्यात आले आहे. जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी अधिक कारवाई सुरू आहे.
या फसवणुकीमुळे छत्तीसगडच्या प्रशासनाने तत्काळ कारवाई करून आरोपीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित व्यक्तीला जामीन मिळवण्याची संधी न देता कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या गोंधळात आणणारा मुद्दा निर्माण झाला आहे आणि प्रशासन या प्रकरणाची गंभीरता ओळखून त्यावर योग्य तो पाऊल उचलत आहे.
सनी लिओनीच्या नावावर होणारी ही फसवणूक खूपच धक्कादायक आहे, आणि यापुढे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन अधिक सतर्क होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.