Sunday, August 31, 2025 09:30:26 AM

WhatsApp Wedding Card Scam: 'लग्नाला नक्की या' असा छोटासा मेसेज, क्लिक करताच गायब झाले लाखो रुपये

ऑनलाईन फसवणुकीचे नवे-नवे प्रकार समोर येत आहेत. स्कॅमर्स आता लोकांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांची फसवणूक आहेत.

whatsapp wedding card scam लग्नाला नक्की या असा छोटासा मेसेज क्लिक करताच गायब झाले लाखो रुपये

WhatsApp Scam: ऑनलाईन फसवणुकीचे नवे-नवे प्रकार समोर येत आहेत. स्कॅमर्स आता लोकांना भावनिकदृष्ट्या गुंतवून त्यांची फसवणूक करतात. सध्या महाराष्ट्रात घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा सावधगिरीची घंटा वाजवली आहे. हिंगोली जिल्ह्यात एका सरकारी कर्मचाऱ्याच्या WhatsApp वर अनोळखी नंबरवरून 'वेडिंग कार्ड' म्हणजेच लग्नाची पत्रिका आली. 'लग्नाला नक्की या' असा छोटासा मेसेज होता. पण जसेच त्या कर्मचाऱ्याने ती लिंक क्लिक केली, काही क्षणांतच त्याच्या बँक खात्यातून तब्बल 1.90 लाख रुपये गायब झाले.

लग्नपत्रिकेच्या नावाखाली फसवणूक
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित कर्मचाऱ्याला मिळालेला मेसेज हा खरे वेडिंग कार्ड नव्हते, तर एक APK फाइल होते. अशा प्रकारच्या फाइलमध्ये मालवेअर असते जे मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाले की युजरची बँकिंग, पर्सनल डेटा आणि पासवर्ड चोरते. त्याच माहितीचा वापर करून स्कॅमर्स थेट बँक खाते रिकामी करतात. 

हेही वाचा: Airtel Down: एअरटेलची सेवा पुन्हा ठप्प! 'या' शहरातील वापरकर्त्यांना करावा लागतोय समस्यांचा सामना

याआधीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या वर्षीही स्कॅमर्सनी लग्नपत्रिकेच्या नावाखाली हजारो लोकांना टार्गेट केले होते. लोक भावनिक कारणामुळे लग्नाचे आमंत्रण लगेच उघडतात आणि स्कॅमर्स हाच कमजोर मुद्दा वापरून मोठ्या प्रमाणावर पैशांची लूट करत आहेत.

असे स्कॅम वाढत चाललेत
सायबर एक्सपर्ट्स सांगतात की, सध्या सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सवर फसवणुकीची नवी लाट आली आहे. कोणी कधी जॉब ऑफरच्या नावाखाली, तर कोणी बक्षिसे किंवा लकी ड्रॉच्या नावाखाली, तर आता लग्नपत्रिकेच्या बहाण्याने लोकांना फसवत आहेत.

हिंगोलीतील प्रकरण हे केवळ एक उदाहरण आहे. प्रत्यक्षात असे प्रकार देशभरात घडत आहेत आणि बऱ्याच वेळा पीडित व्यक्ती लाजेमुळे किंवा अज्ञानामुळे पोलिसांत तक्रार देखील दाखल करत नाही.

हेही वाचा :Anil Ambani: एसबीआयच्या फसवणुकीच्या प्रकरणात अनिल अंबानीवर CBI कारवाई, महत्वाचे दस्तऐवज जप्त

 

स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स
- WhatsApp, ईमेल किंवा सोशल मीडियावर आलेली अनोळखी लिंक किंवा फाइल कधीही क्लिक करू नका.

- जर एखादा मेसेज संशयास्पद वाटत असेल, तर त्याला आधी फोन करून खात्री करा.

- मोबाईलमध्ये अननोन सोर्समधून APK किंवा App इन्स्टॉल करणे टाळा.

- आपल्या बँकिंग माहिती किंवा ओटीपी कोणालाही शेअर करू नका.

- संशयास्पद मेसेज मिळाल्यास लगेच ब्लॉक करा आणि सायबर सेलला कळवा.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांनी सजग राहणे हेच सर्वात मोठे हत्यार आहे. थोडीशी दक्षता घेतली, तर अशा ऑनलाईन फसवणुकीपासून आपण स्वतःला वाचवू शकतो.

 


सम्बन्धित सामग्री