Monday, September 01, 2025 12:21:43 AM

Teen Addiction: कूल दिसण्यासाठी विष प्यायचं? तरूणांना भुरळ घालणारा ई-सिगारेटचा फसवा ट्रेंड

किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान व ई-सिगारेटच्या वाढत्या सवयीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, पालकांनी वेळेवर संवाद साधून सावध राहणे अत्यंत गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत.

teen addiction कूल दिसण्यासाठी विष प्यायचं तरूणांना भुरळ घालणारा ई-सिगारेटचा फसवा ट्रेंड

Teen Addiction: आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच किशोरवयीन मुलांमध्ये अनेक हानिकारक सवयी वाढताना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे धूम्रपान व ई-सिगारेट (व्हेपिंग) यांचे व्यसन. 13 ते 19 वयोगटातील मुले 'ट्रेंड' म्हणून हे व्यसन स्वीकारत असून, त्याचे दुष्परिणाम त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन ठरू शकतात.

ई-सिगारेट व धूम्रपानाची आकर्षक पॅकेजिंग, वेगवेगळ्या चवी उपलब्ध असणे आणि सोशल मीडियाद्वारे त्याचे अप्रत्यक्ष मार्केटिंग यामुळे किशोरवयीन मुले सहज आकर्षित होतात. याशिवाय मित्रांचा दबाव, 'कूल' दिसण्याची इच्छा आणि प्रौढांसारखे वागण्याची हौस यामुळे ही सवय लवकरच व्यसनात बदलते.

धूम्रपान व व्हेपिंगचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
फुफ्फुसविकार तज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल यांच्या मते, किशोरावस्थेत निकोटीनचे सेवन मेंदूच्या विकासावर परिणाम करते. त्यामुळे लक्ष केंद्रित करणे, स्मरणशक्ती आणि एकाग्रतेवर विपरीत परिणाम होतो. धूम्रपान व व्हेपिंगमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते आणि दमा, ब्राँकायटिस व COPD सारख्या विकारांचा धोका वाढतो.

विशेषतः व्हेपिंगमुळे होणारा व्हेप असोसिएटेड लंग इंज्युरी (VALI) हा आजार गंभीर असून, अनेक प्रकरणांमध्ये तो प्राणघातक ठरतो. धूम्रपानामुळे फॉर्मल्डिहाइड, बेंझिन यांसारख्या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या रसायनांचे शरीरात प्रवेश होते.

प्रजनन क्षमतेवर होणारे परिणाम
वरिष्ठ वंध्यत्व तज्ज्ञ डॉ. रीटा मोदी यांच्या मते, धूम्रपान व ई-सिगारेटमधील निकोटीन हार्मोनल संतुलन बिघडवतो. यामुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता कमी होते तर महिलांमध्ये मासिक पाळी व ओव्हुलेशनमध्ये व्यत्यय निर्माण होतो. किशोरवयीन काळात या सवयींमुळे भविष्यातील प्रजनन क्षमतेवरही गंभीर परिणाम होतो.

पालकांनी काय करावे?
ऑन्कोसर्जन डॉ. सुप्रिया बांबरकर सांगतात की, पालकांनी प्रथम स्वतःला तंबाखूजन्य पदार्थांबद्दल शिक्षित करणे आणि मुलांशी संवाद साधणे गरजेचे आहे. किशोरवयीन मुलांना धूम्रपान व व्हेपिंगचे दुष्परिणाम समजावून सांगितल्यास त्यांना ही सवय सोडण्यात मदत होते.

समुपदेशकांची मदत घेणे, सपोर्ट ग्रुप्सचा आधार घेणे आणि मुलांना सकारात्मक पर्यायांकडे वळवणे; हे पालकांनी करणे आवश्यक आहे. मुलांना नियमित व्यायाम, संतुलित आहार, योग व ध्यानाकडे प्रवृत्त करणे आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे महत्त्व पटवून देणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

धूम्रपान व ई-सिगारेटचे व्यसन हे केवळ आरोग्याच्याच नव्हे तर मानसिक, शैक्षणिक आणि भविष्यातील प्रजनन क्षमतेच्या दृष्टीने धोकादायक आहे. त्यामुळे पालकांनी सजग राहून वेळीच पावले उचलली तरच आपल्या मुलांचे आरोग्य सुरक्षित राहू शकते.


सम्बन्धित सामग्री