How Long Does Tea Stay Fresh? : चहा किती वेळात होतो खराब? जाणून घ्या..
आपण भारतीयांसाठी चहा जीव की प्राण आहे. सकाळी दिवसाची सुरूवात असो की सायंकाळची वेळ भारतीयांना चहा लागतोच. चहा घेतला नाहीतर काहीतरी चूकल्यासारखं वाटतं. पण बहुतेक वेळा चहा करून काही तासांनी पुन्हा गरम करून पिण्याची सवय अनेकांना असते. हीच सवय आपल्या आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. चहा केल्यानंतर किती वेळानं खराब होतो, असा प्रश्न अनेकांना पडतो. या लेखातून चहा किती वेळात खराब होतो हे पाहुयात.
विशेषतः चहा तयार झाल्यानंतर तो २ ते ३ तासांपर्यंतच चांगला असतो. या वेळेनंतर चहा साठवून ठेवल्यास त्यामध्ये बॅक्टेरिया फंगस तयार होण्याची शक्यता वाढते. उष्ण हवामानामध्ये हे प्रमाण आणखी वाढू शकते. चहामध्ये दूध, साखर व चहापत्ती असते. जे बॅक्टेरियांच्या वाढीस पोषक ठरतात.
हेही वाचा - उन्हाळ्यात कुंडीतली रोपं सुकतायत? कांद्याच्या सालीचा असा करा वापर, हिरवीगार छान होतील
सामान्यपणे चहा ६० डिग्री सेल्सिअसच्या वर तापमानावर ठेवला तर त्यात बॅक्टेरिया वाढत नाहीत. पण चहा थंड झाल्यानंतर त्यामध्ये लिस्टेरिया, ई.कोलाई, व साल्मोनेला सारख्या घातक बॅक्टेरिया वाढू शकतात. या बॅक्टेरिया मुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब, आणि अन्न विषबाधा होऊ शकते. तुम्ही जर चहा पुन्हा गरम केला तरीही या बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होतीलच याची खात्री नाही. त्यामुळं चहा नेहमी ताजाच प्यावा.
थोडक्यात काय तर चहा तयार केल्यानंतर २ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवलेला चहा पुन्हा गरम करून पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे चहा नेहमी ताजाच प्यावा आणि सतत उकळत ठेवलेला चहा आरोग्यासाठी चांगला नाही.
हेही वाचा - कडक उन्हापासून सुटका हवीय? 'ही' थंड ठिकाणं आहेत एकदम खास
चहा उत्पादनात भारत जगात दुसरा
जगामध्ये सर्वात जास्त उत्पादन हे चीनमध्ये घेतले जाते. यानंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा चहा उत्पादक देश आहे. टी बोर्ड ऑफ इंडियाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतातील एकूण कुटुंबांपैकी सुमारे ८८ टक्के लोक दैनंदिन जीवनात चहाचा वापर करतात. एकूणच भारतातील एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ६४ टक्के लोक चहा पितात.