नवी दिल्ली : आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. दरम्यान संसदेचं यंदाचं सत्र विशेष असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. त्याचबरोबर केंद्र सरकार 16 विधेयकं सादर करणार, अधिवेशनाच्या चर्चेत जास्तीत जास्त सदस्यांनी सहभाग घ्यावा तसेच नवीन सदस्यांना बोलण्यापासून काहीजण रोखत असतात, जनतेनं ज्यांना नाकारलं ते चर्चा होऊ देत नाहीत असे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
कसे होईल संसदेचे हिवाळी अधिवेशन?
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संसदेत 19 बैठका होतील. यंदाच्या अधिवेशनात वक्फ सुधारणा विधेयकासह एकूण 16 विधेयके संसदेत सादर करण्याचे नियोजन सरकारी पातळीवर झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन आहे. संविधान दिन असल्यामुळे 26 नोव्हेंबर रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये कामकाज होणार नाही. संसदेत संविधान दिनानमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमाला सर्वपक्षीय खासदार उपस्थित असतील.
अमेरिकेतील एका न्यायालयात अदानी समुहाविरोधात एक याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणावरुन विरोधक संसदेत गदारोळ करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा तसेच अनेक राज्यांतील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठीच्या पोटनिवडणुकांचे निकाल शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाले आहे. या निकालांचे पडसाद संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे. महागाई, जीएसटी, अत्यावश्यक वस्तूंचे दर या मुद्यांवरुनही संसदेत विरोधक गदारोळ करण्याची शक्यता आहे.