वर्धा: 'सर्वसामान्यांना दर्जेदार आणि स्वच्छ आरोग्य सेवा मिळावी' हे ध्येय बाळगून शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र, वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अव्यवस्थेने या उद्दिष्टांनाच हरताळ फासला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या या शासकीय रुग्णालयात सध्या जी परिस्थिती आहे, ती अक्षरशः धक्कादायक आहे.
रुग्णालयाच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून, कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधी यामुळे रुग्णांसह नातेवाईकांचीही गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे, परिसरात डुकरांचा मोकाट वावर सुरू असून, यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला आहे. रुग्णालयासारख्या संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारचा मोकळा डुकरांचा संचार हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पुरावा आहे. याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे, या रुग्णालयात उपचारानंतर तयार होणारा 'मेडिकल वेस्ट' योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याऐवजी थेट रुग्णालयाच्या बाजूलाच खुले ठेवला जात आहे. त्यामुळे इथे संसर्ग पसरण्याचा धोका अधिक वाढला आहे.
हेही वाचा: Honey Trap: राज्यातील 72 वरिष्ठ अधिकारी, माजी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात?
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील अत्यंत बेजबाबदार आहे. पाण्याच्या टाकीची साफसफाई महिनोन्महिने केली जात नसल्यामुळे रुग्णांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. हे पाणीच आजारांना निमंत्रण देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
'जय महाराष्ट्र'च्या प्रतिनिधींनी केलेल्या पाहणीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली; रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर रिकाम्या दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात असामाजिक तत्वांचा वावर सुरू असल्याचा संशय बळावतो. रुग्णालयाच्या जागेचा वापर हे लोक कशासाठी करतात, याचा शोध घेण्याची आणि कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
हेही वाचा: प्रवीण गायकवाड हल्लाप्रकरणी दीपक काटेला दोन दिवसांची पोलीस कोठडी
वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाचा हा बकाल आणि धोकादायक चेहरा प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम आहे. 'स्वच्छ भारत'चा नारा देणाऱ्या देशात आरोग्यसेवा केंद्र असलेल्या रुग्णालयाची अशी दयनीय अवस्था चिंतेचा विषय आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास रुग्णांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.