नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर गुरूवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झाली. अमित शाह यांच्या निवासस्थानी बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, खासदार सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांविषयी चर्चा झाली.
महायुतीच्या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ वाटपाचे सूत्र ठरले. भाजपाकडे मुख्यमंत्री पद, गृह खाते आणि महसूल खाते राहणार असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नगर विकास खाते आणि पीडब्ल्डी खाते जाणार आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे अर्थ खाते आणि उपमुख्यमंत्री पद दिले जाणार आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये भाजपाचा निरीक्षक महाराष्ट्रात येणार असल्याची शक्यता आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे चित्र स्प्ष्ट होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रात महायुतीचा घवघवीत विजय झाला. भाजपाला 132 जागा, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. भाजपाला महायुतीत मित्र पक्षांहून अधिक जागा मिळाल्याने भाजपाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला. मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोणाचा होईल यावर शिक्कामोर्तब झालं नव्हतं. गुरूवारी दिल्लीत महायुतीची महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेत भाजपाचा मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्रात मंत्रिमंडळ वाटपाबाबत महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याची माहिती आहे.