Windows 10 End of Support: मायक्रोसॉफ्टने जाहीर केले आहे की 14 ऑक्टोबर 2025 नंतर Windows 10 साठी मोफत सुरक्षा अपडेट्स दिले जाणार नाहीत. या निर्णयामुळे जगभरातील लाखो वापरकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कंझ्युमर वॉचडॉग कंझ्युमर रिपोर्ट्सने या संदर्भात मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नाडेला यांना पत्र लिहून कंपनीला हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
वापरकर्त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
कंझ्युमर रिपोर्ट्सच्या मते, Windows 10 सपोर्ट बंद झाल्यास लाखो वापरकर्त्यांना सायबर हल्ले आणि ऑनलाइन फसवणुकीचा धोका संभवतो. ऑगस्ट 2025 पर्यंत जगभरातील अंदाजे 46.2 टक्के संगणक अजूनही Windows 10 वर चालत होते. यापैकी मोठ्या प्रमाणात डिव्हाइसेस हार्डवेअर मर्यादांमुळे Windows 11 वर अपग्रेड करू शकत नाहीत. त्यामुळे हा निर्णय वापरकर्त्यांच्या सुरक्षेशी तडजोड करणारा असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा - Apple iPhone 17 : ॲपलने iPhone 17 सिरीज, iPhone Air सिरीज केली लाँच
मायक्रोसॉफ्टने Windows 10 वापरकर्त्यांना दरवर्षी 30 डॉलर (सुमारे 2,500) मध्ये सुरक्षा अपडेट्स उपलब्ध करून देण्याची ऑफर दिली आहे. मात्र, कंझ्युमर रिपोर्ट्स आणि Public Interest Research Group (PIRG) यांनी या फीवर आक्षेप घेतला आहे. त्यांचे म्हणणे आहे की ही रक्कम सामान्य वापरकर्त्यांना परवडणारी नाही आणि यामुळे डिजिटल सुरक्षेतील दरी आणखी वाढेल.
हेही वाचा - India’s Data Centre : 'डेटा ट्रॅफिक वाढीमुळे भारतातील डेटा सेंटर उद्योगाला गती'; जेफरीज कंपनीनं केलं स्पष्ट
400 दशलक्ष संगणकांचे काय?
PIRG च्या अंदाजानुसार, जर Windows 10 सपोर्ट पूर्णपणे थांबला तर अंदाजे 400 दशलक्ष संगणक निरुपयोगी ठरतील. दरम्यान, संस्थांनी मायक्रोसॉफ्टवर दुहेरी मानके असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे कंपनी लोकांना सुरक्षा कारणांचा हवाला देत Windows 11 वर अपग्रेड करण्यास भाग पाडत आहे, तर दुसरीकडे Windows 10 वापरणाऱ्या लाखो वापरकर्त्यांना सपोर्टशिवाय सोडत आहे.
अपग्रेडचे आव्हान
Windows 11 साठी TPM 2.0 आणि आधुनिक हार्डवेअर आवश्यक आहेत, जे अनेक जुन्या संगणकांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे लाखो वापरकर्त्यांसमोर दोनच पर्याय उरतात, एकतर नवीन संगणक खरेदी करणे किंवा सपोर्टशिवाय असुरक्षित प्रणालीवर काम करणे. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टचा निर्णय वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेपेक्षा नफ्यावर केंद्रित असल्याची टीका वाढत आहे.