सोमवारी असे करा शिवपूजन (Worship Lord Shiva On Monday) : हिंदू धर्मात, सोमवार हा दिवस देवांचा देव महादेवाला समर्पित आहे. या शुभ दिवशी भगवान शिवासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते. यासोबतच, या दिवशी उपवासही पाळला जातो. असे मानले जाते की, जो कोणी सोमवारी खऱ्या मनाने भगवान शिवाची पूजा करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. जर तुम्हाला तुमच्या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल किंवा तुमच्या आयुष्यात आनंद, शांती, समृद्धी आणि प्रगती मिळवायची असेल तर सोमवारी हे 5 उपाय नक्कीच करून पहा. असे केल्याने तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद मिळू शकतात, अशी मान्यता आहे. या खास उपायांबद्दल जाणून घेऊया.
या स्तोत्राने भगवान शिवांची आराधना करा
भगवान शिवाच्या 'ॐ नमः शिवाय' या पंचाक्षरी मंत्राचा शक्य होईल तसा जप करत रहावा. या पंचाक्षरी मंत्राचे महत्त्व सांगणारे आणि शिवाचे वर्णन करणारे 'शिव पंचाक्षर स्तोत्र' भगवान शिवांना अत्यंत प्रिय आहे. या स्तोत्राचा जमेल तेवढा पाठ करावा. तसेच, वर्षातून किमान एकदा या स्तोत्राचा एका दिवसात (एक रात्र आणि एक दिवस मिळून) 108 वेळा पाठ करणे अत्यंत शुभंकर असते. याशिवाय, या स्तोत्राचा अर्थ आणि भावार्थ समजून घेऊन त्याचे चिंतन करत रहावे.
हेही वाचा - Ram Navami 2025: रामनवमीला बाळाचा जन्म झालाय? चिमुकल्यांसाठी श्रीरामावरून ही खास नावं अर्थासहित..
भगवान शिवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी
सोमवार हा दिवस भगवान शिवाच्या उपासनेसाठी खूप खास मानला जातो. या दिवशी भक्त भगवान शिवासह देवी पार्वतीची पूजा करतात. भगवान शिव यांना भोलेनाथ असेही म्हणतात. कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. त्यांना एक तांब्या भरून पाणी मनापासून आणि प्रेमाने अर्पण केले तरी ते संतुष्ट होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला भगवान शिव यांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर सोमवारी पूजा करताना भगवान शिव यांना गंगाजलाने अभिषेक करा. शक्य नसेल, तर कोणत्याही साध्या पाण्याने अभिषेक करावा.
मनातील इच्छेसाठी
जर तुमच्या मनात काही इच्छा असेल तर, सोमवारी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि विधीनुसार भगवान शिवाची पूजा करा. पूजेच्या वेळी शिवाला पांढरे चंदन, बेलपत्र, काळे तीळ, पांढरी फुले वाहा. शक्य असेल तर पांढरी सुगंधी फुले अर्पण करा. त्यानंतर, त्यांची आरती करा आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा.
समस्या सोडवण्यासाठी उपाय
प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या असतात. जर तुम्हाला त्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी शिवरक्षा स्तोत्राचे पठण करा. असे मानले जाते की, यामुळे तुमच्या समस्या तर सुटतीलच पण तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती देखील येईल.
आरोग्यासाठी आणि पैशांशी संबंधित समस्यांसाठी
जर तुम्ही शारीरिक किंवा मानसिक ताणतणावाने त्रस्त असाल तर किंवा तुम्हाला आर्थिक अडचणी येत असतील तर, सोमवारी गंगाजलाने भगवान शिवाला अभिषेक करा. यासोबतच महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. या उपायाने तुमच्या मनाला आणि शरीराला शांती मिळेल. तसेच, असे केल्याने तुमच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी येईल, असे मान्यता आहे.
हेही वाचा - God Is Real : देव खरंच आहे..! हार्वर्डचे शास्त्रज्ञ डॉ. विली सून यांचा दावा; हे सिद्ध करणारे गणितीय सूत्र उलगडले
भगवान शिव भोलेनाथ आहेत; मात्र, ते रागावले तर खैर नाही..
भगवान शिव भोलेनाथ आहेत. यामुळेच ते सर्वांना प्रिय आहेत. ते त्यांची भक्ती करणाऱ्यांवर लगेच प्रसन्न होतात आणि इच्छित गोष्टही देतात. मात्र, भगवान शिवांचा राग किंवा संताप किती भयंकर आहे, हेही आपणा सर्वांना माहीतच आहे. भगवान शिवांना लांडी-लबाडी केलेली मुळीच खपत नाही. इतर भक्तांना त्रास दिसेला किंवा सज्जन माणसाला दुखावलेले त्यांना आजिबात आवडत नाही. तेव्हा इतरांविषयीचा द्वेष, मत्सर, असूया, वाईट भावना यांचा मनापासून त्याग करून भगवान शिवांना शरण जावे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)