Wednesday, August 20, 2025 09:24:25 AM

'या' कारणांमुळे तुटतं नातं; आपणच खोदत आहोत स्वतःसाठी खड्डा..

विविध कारणांमुळे माणसं माणसांपासून दूर जात आहेत आणि माणूसपण, माणुसकी विसरत आहेत. अनेक स्वभावदोष तर काही मानसिक आजार लोकांमध्ये तयार होत आहेत. याची कारणं काय असावीत, याबाबात तज्ज्ञांचं मत जाणून घेऊ..

या कारणांमुळे तुटतं नातं आपणच खोदत आहोत स्वतःसाठी खड्डा

Problems In Relations : सध्याच्या काळात प्रियकर-प्रेयसीवर हल्ले, एकतर्फी प्रेमातून हल्ला, खून,  ऑनर किलिंग, आत्महत्या अशा गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याशिवाय, घटस्फोट, नात्यांमधील दुरावा, सततची भांडणे हेही वाढले आहे. एकमेकांना समजून न घेणे, दुखावल्याची आणि अपमानित झाल्याची भावना यातून टोकाचे पाऊल उचलणेही वाढले आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे, पूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेलेही अनेक लोक अशा प्रकारच्या विळख्यात अडकत आहेत. समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यावर खूप सखोल विचार करत आहेत.

बहुतेक तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, नकार पचवता न येणे, आपल्या मतापेक्षा वेगळे मत सहन न होणे, अधिकार गाजवण्याची प्रवृत्ती, माझे ते खरे म्हणण्याची प्रवृत्ती, संशयी वृत्ती, मालकी हक्क असल्याची भावना, अहंकार ही यामागची कारणे आहेत. विविध कारणांमुळे माणसं माणसांपासून दूर जात आहेत आणि माणूसपण, माणुसकी विसरत आहेत. आपल्यासोबत इतरांचं असणं आणि त्यातही आपल्यापेक्षा वेगळेपण असणं खपत नसल्याचं अनेकांच्या बाबतीत घडत आहे. अनेक स्वभावदोष तर काही मानसिक आजार लोकांमध्ये तयार होत आहेत. याची कारणं काय असावीत, याबाबात तज्ज्ञांचं मत जाणून घेऊ..

हेही वाचा - Chanakya Niti : 'अशा' पुरुषांवर भाळतात महिला; बायको, प्रेयसी जोडीदाराच्या या गुणांवर असतात खूश

ही आहेत कारणं

- विभक्त कुटुंब पद्धतीत लहानाचं मोठं होणं
- एकुलतं एक किंवा हम दो, हमारे दो संस्कृतीत प्रमाणाबाहेर लाड होणं
- लोकांच्यात मिसळणं कमी असणं किंवा कमी होणं
- सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे स्वतःच्या विश्वात गुरफटून राहणं
- सध्या सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मस, सीरियल्स आणि चित्रपटांमध्ये अनेक ठिकाणी अनेक घटना अजिरंजितपणे दाखवल्या जात आहेत.
- अशा भडकावू चित्रपटांना वारंवार स्वतःच्या जीवनातील वास्तवातील घटनांशी जोडून पाहण्याची सवय लागणं (यामुळे विचार कमी होतो आणि अविचार वाढतो आहे), सतत इतरांसोबत तुलना करत राहणं
- लोकांमध्ये अहंकार, मत्सर, आक्रमकता, सहनशीलतेचा अभाव, असुरक्षिततेची भावना, हाव आणि हक्क दाखवण्याची वृत्ती वाढली आहे.

या गोष्टी कधी स्वभावदोषांचे तर कधी मानसिक विकारांचे रूप धारण करतात.

वरील कारणांमुळे हक्क दाखवण्याची प्रवृत्ती वाढते. हक्क दाखवण्याच्या वृत्तीमुळे -

- आपल्या जोडीदारावर संशय वाढतो.
- जोडीदारावर नजर ठेवण्याचा किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रकार सुरू होतो.
- नात्यांमध्ये भांडणे वाढतात.
- आक्रमकता वाढते. धमक्या देण्याची प्रवृत्ती वाढते. आत्म-नियंत्रण कमी होते.
- नात्यांमध्ये विघ्न येते. हे नातेसंबंध तुटण्याचे मुख्य कारण आहे.
- आत्महत्या आणि खुनाच्या भावना वाढतात.

एवढे सगळे साईड इफेक्टस हक्क दाखवण्याची वृत्ती आणि अहंकारामुळे होतात.

हक्क दाखवण्याची वृत्ती का निर्माण होते?
हक्क दाखवण्याची वृत्ती ही एक अशी मानसिकता आहे, ज्यामध्ये एखादी व्यक्ती इतरांच्या जीवनावर, वेळेवर आणि भावनांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करते आणि अनेकदा इतरांना नियंत्रित करणे आवडते. हक्क दाखवण्याची वृत्ती विशेषतः वैयक्तिक संबंधांवर परिणाम करते. जर या प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवले नाही, तर ते तणाव, निराशा, नैराश्य आणि नातेसंबंध बिघडण्यास कारणीभूत ठरू शकते. जोडीदारावरचा अविश्वास, भूतकाळातील वेदनादायक घटना आणि नाते गमावण्याची भीती यामुळेही हक्क दाखवण्याची वृत्ती वाढते. अत्यधिक संशय आणि अहंकारामुळे देखील हक्क दाखवण्याची वृत्ती दिसून येते.

हेही वाचा - Chanakya Niti: आचार्य चाणक्यांचा विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र; यश हवंय ना? मग या 4 गोष्टी नक्की करा

हक्क दाखवण्याच्या वृत्तीची लक्षणे आणि उपचार
हक्क दाखवणारे लोक जास्त भावनिक, आक्रमक आणि अहंकारी असतात. त्यांच्यात विश्वासाची कमतरता असते आणि त्यांची इतरांवर हुकमत गाजवण्याची आणि नियंत्रण ठेवण्याची इच्छा असते. त्यांच्यात खूप जास्त प्रमाणात मत्सर असतो.

अति प्रमाणात आपुलकी, लाड किंवा प्रेम देखील हानिकारक असू शकते. असे म्हणतात की, 'अति तेथे माती'. प्रचंड भावनिकता आणि दुसऱ्यावर नियंत्रण करण्याच्या प्रवृत्तीमुळे व्यक्ती आत्महत्येच्या टोकाला पोहोचू शकते. किंवा दुसऱ्यावर हल्लाही करू शकते. जर तुम्ही स्वतःहून दुसऱ्या माणसाला योग्य ते स्वातंत्र्य दिले, तर नाते टिकून राहील, ही बाब सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे.
आपल्या भावना एकमेकांसोबत शेअर करा. एकमेकांना पर्सनल स्पेस द्या. जेणेकरून ते स्वतःला ओळखू शकतील. गरज असेल तर, मानसशास्त्रज्ञांची, उपचारांची मदत घ्या आणि लोकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न सोडून द्या. तशी भावना कमी करा. स्वतःच्या भावना ओळखायला शिका. अयोग्य भावना स्वतःच कमी करण्याचा प्रयत्न करा. कारण एकमेकांचे स्वातंत्र्य मान्य केल्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. अति हक्क दाखवण्याची वृत्ती नात्यांमध्ये गंभीर समस्या निर्माण करते.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री