उन्हाळा सुरू झाला की लिंबूच्या मागणीत मोठी वाढ होते. पण यंदा बाजारात लिंबाचे दर चांगलेच वाढलेले दिसत आहेत. सरासरी 70 ते 100 रुपये डझनाने मिळणारे लिंबू काही ठिकाणी १५० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत, अनेकांना लिंबू दीर्घकाळ टिकवून ठेवण्याच्या उपाययोजना जाणून घ्यायच्या आहेत.
लिंबांचे वाढलेले दर आणि कारणे
लिंबांच्या किंमती वाढण्यामागे अनेक कारणे आहेत. हवामानातील बदल, उत्पादनात घट, वाहतुकीच्या अडचणी आणि उन्हाळ्यात लिंबांची वाढती मागणी यामुळे दर वाढले आहेत. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आणि काही भागांत अस्मानी संकटामुळे लिंबू उत्पादनावर परिणाम झाला आहे. परिणामी, लिंबांची उपलब्धता मर्यादित झाली असून किंमती वाढल्या आहेत.
हेही वाचा: Navi Mumbai: सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
लिंबू दीर्घकाळ टिकवण्यासाठी घरगुती उपाय
लिंबू लगेच खराब होऊ नयेत यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय अवलंबता येऊ शकतात.
फ्रीजमध्ये साठवणे: लिंबू फ्रिजमध्ये ठेवल्यास ते 2 ते 3 आठवडे ताजे राहतात. लिंबू प्लास्टिक पिशवीत किंवा एअरटाइट डब्यात ठेवल्यास त्यातील ओलावा टिकून राहतो आणि ते लवकर कोमेजत नाहीत.
पाण्यात बुडवून ठेवणे: एका भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात लिंबू टाकावेत. यामुळे लिंबू कोरडे पडत नाहीत आणि काही दिवस ताजे राहतात.
कापडात गुंडाळून ठेवणे: लिंबू कापडात गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवल्यास ते जास्त काळ टिकतात.
लिंबाचा रस साठवणे: लिंबाचा रस काढून तो बर्फाच्या ट्रेमध्ये गोठवून ठेवावा. आवश्यकतेनुसार हे लिंबू आईस क्यूब्स स्वयंपाकात वापरता येतील.
मीठ किंवा साखर लावून ठेवणे: लिंबाच्या चकत्या करून त्यावर मीठ किंवा साखर लावून हवाबंद डब्यात ठेवले तर ते जास्त काळ टिकतात.
लिंबू महाग असले तरी योग्य साठवणुकीमुळे त्याचा फायदा जास्त काळ मिळवता येतो. हे घरगुती उपाय अवलंबून तुम्ही उन्हाळ्यात लिंबू वाया जाऊ न देता ताजे आणि चवदार ठेवू शकता.