Pumpkin Seeds vs Meat: आपल्या आहारात प्रथिनांचं महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. शरीरातील स्नायूंची वाढ, पेशींना ऊर्जा आणि शरीरक्रियांसाठी प्रथिनं अनिवार्य घटक आहेत. आजच्या आरोग्याबद्दल सजग समाजात, अनेक लोक मांसाहार टाळत शाकाहाराकडे वळत आहेत. अशा वेळी 'वनस्पतीजन्य प्रथिनांचे चांगले स्रोत कोणते?' हा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यात भोपळ्याच्या बिया एक लोकप्रिय पर्याय मानल्या जातात. पण, खरंच या बिया मांसाहाराच्या तुलनेत श्रेष्ठ ठरू शकतात का?
भोपळ्याच्या बियांतील पोषणमूल्य
भोपळ्याच्या बियांना सुपरफूड म्हटलं जातं, त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यातील प्रथिनं, चांगले फॅट्स, फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि महत्त्वाची खनिजं. 100 ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये सुमारे 30 ते 32 ग्रॅम प्रथिनं असतात. त्यात झिंक, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्नसारखी खनिजं भरपूर प्रमाणात असतात. त्याशिवाय, यात पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि फायबर्सही भरपूर असतात, जे पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहेत.
मांसाहारातील प्रथिनांचा दर्जा
दुसरीकडे, मांसाहार विशेषतः कोंबडी, मासे, अंडी हे संपूर्ण प्रथिनांचे स्रोत मानले जातात. म्हणजेच, यामध्ये सर्व आवश्यक अमिनो अॅसिड्स योग्य प्रमाणात असतात, जे शरीर स्वतः निर्माण करू शकत नाही. 100 ग्रॅम चिकनमध्ये सुमारे 31 ग्रॅम प्रथिनं आणि फक्त 250 कॅलरीज असतात. शिवाय, यात फॅट्स तुलनेने कमी असतात, आणि कार्बोहायड्रेट्स अगदी नगण्य.
पचन आणि शोषणात फरक
प्रथिनांचं पचन आणि शोषण हे त्या अन्नातील ‘प्रोटीन क्वालिटी स्कोअर’वर अवलंबून असतं. मांसाहाराचं प्रथिन पचनक्षमतेच्या दृष्टीने सर्वोत्तम मानलं जातं. त्यामध्ये अमिनो अॅसिड्सची संरचना पूर्ण असून शरीर त्याचे पूर्णपणे शोषण करू शकतं. तुलनेत, भोपळ्याच्या बियांमधील काही आवश्यक अमिनो अॅसिड्स कमी प्रमाणात असतात आणि त्यांच्या पचनक्षमतेत मर्यादा असते. त्यामुळे त्या उत्कृष्ट असल्या तरी, एकट्याच प्रथिनांचा पूर्ण स्रोत ठरत नाहीत.
प्रमाण आणि व्यावहारिकता
थिअरिटिकली, भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिनं जास्त असली तरी, प्रत्यक्षात त्याचं सेवन जास्त प्रमाणात करावं लागतं. 100 ग्रॅम भोपळ्याच्या बिया म्हणजे जवळपास तीन मुठी एवढं प्रमाण, जे एका वेळच्या जेवणात खाणं कठीण आहे. त्यातच, 100 ग्रॅम बियांमधून सुमारे 550 कॅलरीज मिळतात, ज्यात सुमारे 430 कॅलरीज फॅट्समधून येतात. यामुळे वजन नियंत्रणावरही परिणाम होऊ शकतो. त्याउलट, मांसाहाराचं प्रमाण कमी असूनही प्रथिनं योग्य प्रमाणात मिळतात.
भोपळ्याच्या बियांमुळे होणारे संभाव्य त्रास
भोपळ्याच्या बियांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने त्या अचानक मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगणे, गॅस होणे किंवा अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे या बिया हळूहळू आणि मोजक्याच प्रमाणात खाणं गरजेचं आहे.
याशिवाय, या बियांमध्ये ‘फायटिक अॅसिड’ असतं, जे शरीरातील झिंक, लोह, मॅग्नेशियम यांसारख्या खनिजांचं शोषण कमी करतं. त्यामुळे या बियांना भिजवून किंवा अंकुरित करून खाल्ल्यास फायटिक अॅसिडचं प्रमाण कमी होतं आणि त्यातील पोषणमूल्य शोषलं जातं.
योग्य समतोल आणि आहार नियोजन
मांसाहार आणि भोपळ्याच्या बिया यांची तुलना करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की, एक घटक दुसऱ्याचा पूर्ण पर्याय होऊ शकत नाही. मात्र, दोन्हीचा योग्य समतोल ठेवल्यास किंवा शाकाहारी व्यक्तींनी भोपळ्याच्या बियांसोबत इतर प्रथिनांचे स्रोत उदा. सोयाबीन, वाटाणे, राजमा यांचा समावेश केल्यास त्यांची पोषणमूल्यं वाढू शकतात.
भोपळ्याच्या बिया निश्चितच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, पण त्या मांसाहाराला पूर्ण पर्याय ठरू शकत नाहीत. त्या "पूरक प्रथिन स्रोत" म्हणून वापराव्यात. शाकाहार करताना विविध प्रकारच्या वनस्पतीजन्य प्रथिनांचा योग्य मिश्रण करून आहार घेतल्यास शरीराला आवश्यक सर्व अमिनो अॅसिड्स मिळू शकतात. त्यामुळे, कोणताही अन्नघटक अति प्रमाणात न खाता, संतुलित आणि सुज्ञ आहार योजना हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.)