सातारा : फुलांचे पठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. या नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी हजारो पर्यटक कास पठाराला भेट देत आहेत. या पर्यटकांच्या सोयीसाठी वन विभाग आणि कास समितीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लवकरच पठारावर पर्यटकांच्या वाहतुकीसाठी चार नवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होणार आहेत. यामुळे पर्यटकांची ने-आण सुलभ होणार आहे.
कुमुदिनी तलावापर्यंतचा प्रवास सुलभ होणार
कास पठारावरील मुख्य रस्त्यापासून सुमारे तीन ते चार किलोमीटर दूर असलेल्या कुमुदिनी तलावापर्यंत पर्यटकांना पायी जावे लागते. हे अंतर विशेषतः महिला, लहान मुले आणि वृद्ध पर्यटकांसाठी त्रासदायक ठरते. ही नवी वाहने पर्यटकांना या तलावापर्यंत ने-आण करतील, ज्यामुळे प्रवास सोयीस्कर होईल. इलेक्ट्रिक वाहने आणण्याचा हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रदूषणमुक्त परिसर: कास पठार हे एक संवेदनशील पर्यावरण क्षेत्र आहे. मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी होत असल्याने प्रदूषण वाढते. ही इलेक्ट्रिक वाहने कुमुदिनी तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर प्रदूषण नियंत्रित ठेवण्यास मदत करतील, कारण त्यांचा वापर केवळ याच मार्गासाठी केला जाईल.
हेही वाचा - Kaas Pathar Satara 2025 : निसर्गरम्य 'कास पठार'ला कसे पोहोचाल? प्रवेश शुल्क, राहण्याची ठिकाणं, सहलीचा एकूण खर्च जाणून घेऊ..
वाहनांची वैशिष्ट्ये
वन विभाग आणि कास समितीने ही चार वाहने खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी या वाहनांमध्ये काही बदल केले जातील.प्रत्येक वाहनात आठ ते दहा प्रवासी बसू शकतील. या मार्गावरील रस्ता कच्चा असून, तो जांभ्या दगडाचा असल्याने मजबूत वाहनांची गरज आहे. ही नवीन वाहने अशा रस्त्यावर सहज चालतील.
सध्याची वाहतूक व्यवस्था
सध्याच्या नियमांनुसार, कास पठारावर होणारी गर्दी टाळण्यासाठी खासगी वाहनांना थेट प्रवेश दिला जात नाही. पर्यटक आपली वाहने घाटाई फाट्यावरील किंवा कास तलावाजवळील वाहनतळात उभी करतात आणि तेथून समितीच्या बसने पठारावर येतात. या नव्या इलेक्ट्रिक वाहनांमुळे पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेत कुमुदिनी तलावापर्यंतचा प्रवास अधिक सुखद वाटेल.
हेही वाचा - Tourism in Maharashtra : फिरण्याचा सिझन सुरू होतोय; ही आहेत महाराष्ट्रातली टॉप हिल स्टेशन्स