Sunday, August 31, 2025 08:26:02 AM

उन्हाळ्यात साप चटकन हल्ला का करतात? सर्पदंश टाळण्यासाठी घ्या अशी खबरदारी

उष्णतेमुळे सापांमध्ये एक वेगळीच भीती निर्माण होते. सध्या शेतातील पिकांची कापणी सुरू आहे, ज्यात मोठ्या संख्येने साप बाहेर पडण्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर याच वेळी साप घरातही शिरतात.

उन्हाळ्यात साप चटकन हल्ला का करतात सर्पदंश टाळण्यासाठी घ्या अशी खबरदारी

Do You See More Snakes In Summer? : साप या प्राण्याला मध्यम स्वरूपाचे हवामान आवडते. हा प्राणी जास्त उष्णता आणि जास्त थंडी सहन करू शकत नाही. साप शक्यतो पाणी जवळ असलेल्या किंवा ओलावा असलेल्या जागेच्या आसपास राहणं पसंत करतात. उष्णतेमुळे सापांमध्ये एक वेगळीच भीती निर्माण होते. उन्हाळ्यात सापांना उष्णता सहन होत नाही. त्यांना शरीराचे तापमान योग्य राखण्यासाठी पाणी असलेल्या किंवा ओलसर जागेच्या शोधात बाहेर पडावे लागते. यामुळे उन्हाळ्यात साप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात.

शिवाय, कडक उन्हाळा सुरू होण्यापूर्वी शेतांमध्ये पिकांची कापणी सुरू होते. या पिकांमध्ये ओलाव्याला आणि आडोशाला साप बसलेले असतात. कापणी सुरू झाली की, शेतात माणसांचा वावर वाढतो आणि पीक कापले जाईल तसे साप दृष्टीस पडू लागतात. शिवाय, त्यांनाही माणसापासून भीतीची भावना उत्पन्न झाल्यामुळे ते इकडे तिकडे सरपटत निघून जाण्याचा प्रयत्न करतात. शेतातील धान्य कापणीच्या वेळी आणि त्यानंतर उंदीर धान्य खायला येतात आणि उंदीर हे सापांचे खाद्य आहे. अशा परिस्थितीत उंदरांमुळे तिथे साप येऊन पोहोचतात.

हेही वाचा - सर्पदंशावर मंत्रतंत्र खरंच उपयोगी पडतात? या उपायाने जीव वाचतो? सत्य जाणून आश्चर्य वाटेल

साप हे असे प्राणी आहेत, जे जास्त उष्णता आणि जास्त थंडी सहन करू शकत नाहीत. उन्हाळ्यात साप उष्णतेमुळे अस्वस्थ होतात आणि थंड जागांचा शोध घेत घरातही प्रवेश करतात. घरातील कपडे-भांडी धुण्याची जागा किंवा पाण्याची जागा अशा ठिकाणी त्यांना ओलावा मिळतो. शिवाय, सध्या शेतांमध्ये कापणी सुरु असल्यामुळे हे साप लपण्याच्या जागेच्या शोधात बाहेर पडतात आणि याच प्रयत्नात ते कधी-कधी घरात शिरतात.

बहुतेक साप थंडीच्या शोधात घरात शिरतात. थंडी मिळवण्यासाठी ते जुन्या गवताच्या घरातही लपून बसतात. प्रथम, ते उष्णतेमुळे बेचैन असतात, दुसरे म्हणजे ते अन्नाच्या शोधात असतात आणि तिसरे म्हणजे, जर कोणी त्यांना त्रास दिला, तर ते खूप चवताळतात. त्यामुळे या ऋतूत सापांपासून दूर राहणे आवश्यक आहे. योग्य सावधगिरी बाळगल्यास स्वतःचा आणि त्यांचाही जीव वाचवता येऊ शकतो.

पिकांची कापणी करताना, उन्हाळ्याच्या आसपास शेतातील तण काढताना साप बाहेर पडतात. कारण जमीन मोकळी होते आणि त्यांना लपायला जागा मिळत नाही. साप किंवा अशा इतर कोणत्याही प्राण्याचे शरीराचे तापमान एकसारखे नसते. त्यामुळे त्यांना त्यांच्या शरीराचे तापमान संतुलित करण्यासाठी बरीच कसरत करावी लागते, असे प्राणीशास्त्र तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अशा प्रकारे सापांपासून स्वतःला वाचवा
उन्हाळ्यात साप त्यांच्या रक्ताचं तापमान थंड करण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी जागा शोधतात. या काळात साप पाण्याजवळच्या बिळात जातात. त्यामुळे अशा ठिकाणांपासून सावध राहिले पाहिजे. कापणीनंतर शेतातील धान्य खळ्यात किंवा त्यानंतर घरात ठेवले असेल तर, ते खाण्यासाठी उंदीर हमखास येतात. उंदीर हे सापांचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे उंदरांचा माग काढत, पाठलाग करत साप धान्याजवळ जाऊन पोहोचतात. यासाठी पिकांची कापणी करताना, पिकांमध्ये चालत जाताना नेहमी सावधगिरीने बाळगणे आवश्यक आहे. तसेच, पायात बूट घालावेत. शक्य असल्यास गम बूट वापरावेत. पाणी असलेल्या ठिकाणी, खड्ड्यांमध्ये आणि जिथे थंड माती आहे, अशा ठिकाणी जाणे टाळावे.

हेही वाचा - उन्हाळ्यात कुंडीतली रोपं सुकतायत? कांद्याच्या सालीचा असा करा वापर, हिरवीगार छान होतील

त्रास दिला, तर हल्ला करू शकतात
अति उष्णतेमुळे साप दिवसा बाहेर पडत नाहीत. पण ते रात्री अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. या काळात ते बेचैन राहतात. जर त्यांना त्रास दिला गेला, तर ते हल्ला करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सापाने चावा घेतला, तर चावलेल्या भागाच्या थोड्या वरच्या बाजूला कपडा घट्ट बांधा आणि वेळ न घालवता त्वरित रुग्णालयात जा. चावलेल्या सापाकडे नीट पाहा. त्यांचे वर्णन रुग्णालयात सांगावे लागू शकते. तसेच, साप चावल्यानंतर तुम्हाला जाणवणाऱ्या लक्षणांकडे नीट लक्ष ठेवा. घाबरण्याऐवजी पटापट निर्णय घेऊन कृती करा.


सम्बन्धित सामग्री