मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला गेला आहे. शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यासाठी 1932.72 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. कृषी आयुक्तालयाकडे हा निधी प्राप्त झाला असून लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
कृषी आयुक्तालयाने याबाबत शासनाला विनंती केली होती. पी.एम. किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याच्या एफटीओ (FTO) डाटाच्या आधारे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत पात्र लाभार्थ्यांना सातव्या हप्त्यातील लाभ वितरित करण्यासाठी 1932.72 कोटी रुपये निधी आवश्यक असल्याचे कळवण्यात आले होते. यानंतर शासनाने ही मागणी मान्य करत अधिकृत शासन निर्णय काढला आहे.
निर्णयानुसार, हा निधी शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रक आणि कार्यपद्धतीनुसारच खर्च केला जाईल. प्रस्तावित केलेली रक्कम योग्य आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा होईल, याची जबाबदारी थेट कृषी आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. यासोबतच निधी वितरण करताना कोणतीही अनियमितता होणार नाही, याची काळजी घेणे बंधनकारक आहे.
हेही वाचा: Pune Ganpati Visarjan 2025: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि मार्ग जाहीर
योजनेंतर्गत प्रत्येक हप्त्यावेळी लाभार्थ्यांना निधी वितरित केल्यानंतर जर योजनेच्या बँक खात्यात काही रक्कम उरली असेल किंवा त्यावर मिळालेल्या व्याजाची रक्कम असेल, तर ती त्वरित शासनाच्या खाती जमा करण्याची जबाबदारीही कृषी आयुक्तांची असेल.
शेतकऱ्यांना दिलासा
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी गेंम चेंजर ठरली आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळणारे हे हप्ते आर्थिक मदतीचा हात ठरतात. एप्रिल ते जुलै 2025 या कालावधीतील सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या हातात येत असल्याने त्यांच्या हंगामी खर्चासाठी ही मदत उपयुक्त ठरणार आहे. बियाणे, खते, औषधे आणि शेतीच्या इतर गरजांसाठी या निधीचा थेट फायदा होणार आहे.
सरकारने सातव्या हप्त्यासाठी 1932.72 कोटींचा निधी मंजूर केला असून हा निधी शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. शासन निर्णयानुसार संपूर्ण निधी पारदर्शक पद्धतीने आणि वेळेत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल. तसेच पुढील हंगामाची तयारी करण्यासाठी मदत मिळणार आहे.