विजय चिडे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने विसावा घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिके खराब होत असून विविध रोगांमुळेही पिकांची अवस्था वाईट झालेली आहे. विविध भागांमध्ये पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. त्या भागात पावसाची आवश्यकता आहे. जवळपास सर्वच भागात 100 मिमी पेक्षा अधिक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. मात्र आता पिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यातच तणाचाही त्रास काही भागात वाढला आहे. महिनाभरापासून पाऊस गायब झाल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.
मराठवाड्यात रविवारपर्यंत 90 टक्के क्षेत्रावर पेरणी आणि 65 टक्के पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यात पावसाचा पॅटर्न सतत बदलत असल्याचे दिसून येत आहे. मराठवाड्यात मे महिन्यात अवकाळी पाऊस पडला. जून महिन्यात मात्र पेरणीलायक पाऊस झाला होता. काही जिल्ह्यात तोही झाला नाही. यामुळे यंदा खरिपाची पेरणी लांबलेली दिसते. यावर्षी मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात एकूण क्षेत्रापैकी 90 टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.
हेही वाचा: Ro Ro Ferry: गोव्यात जलमार्ग वाहतुकीला वेग, उच्च-गती रो रो फेऱ्यांची सेवा सुरू
मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यात 90 टक्के पेरणी पूर्ण?
छत्रपती संभाजीनगर - 93 टक्के
जालना - 91 टक्के
बीड - 83 टक्के
लातूर - 95 टक्के
धाराशिव - 92 टक्के
नांदेड - 95 टक्के,
परभणी - 90 टक्के
हिंगोली - 85 टक्के
महिनाभरात पीक वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले होते. परंतु सध्या पाऊस न आल्यास पिकातून उत्पादनात कमालीची घट होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. येत्या पाच ते सहा दिवसात पाऊस न आल्यास कोरडवाहू हलक्या जमिनीतील पीक मोडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने शेतकऱ्यांना धास्ती लागली आहे. मागील वर्षी परिसरात सातत्याने अतिवृष्टी परिस्थितीमुळे खचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर या वर्षी दीर्घ पावसाच्या उसंतीने मीठ चोळल्या गेले आहे. मागील दोन वर्षात अतिवृष्टीमुळे खरीप तर बेमोसमी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना जबर हादरे बसल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा मोडला आहे. तालुक्यातील अल्प अत्यल्प भूधारकांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे आतापर्यंत या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पार ढवळून निघाली होती.
यावर्षी पावसाने घेतलेल्या दीर्घ विश्रांतीमुळे बडे शेतकरीही हादरले असल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षात अतिवृष्टी, गारपिटीच्या तडाख्यातही परिसरातील सोयाबीन, कापूस, हरभऱ्याचे समाधानकारक उत्पादन शेतकऱ्यांनी काढले होते. परंतु बाजारात सर्वच शेतमाल बेभाव विकल्यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटात उभे राहण्याची आर्थिक क्षमता शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आता पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांच्या गुराढोरांचा चारा पाण्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. पावसाचे अडीच महिने पूर्ण झाले. आता पुढील दीड महिन्यात काय होईल, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.