मुंबई: आमदार सुरेश धस यांनी खोक्या प्रकरणाच्या आडून आपला खून करण्याचा कट शिजत होता, असा खळबळजनक आरोप केला आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, काही विशिष्ट लोकांनी आपल्या प्रतिमेला मलीन करण्याचा प्रयत्न केला. राजस्थानमधील बिष्णोई समाजातील काही लोकांना मुंबईत उपोषणासाठी बसवून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा कट रचला गेला. खोक्या नावाचा व्यक्ती वनखात्याच्या जमिनीवर राहत होता आणि त्याच्या आर्थिक व्यवहारांवरून त्याला चर्चेत आणले गेले. मात्र, हा विषय फक्त आर्थिक गैरव्यवहारांपुरता मर्यादित नसून, मोठ्या राजकीय कटाचा भाग असल्याचा धस यांचा आरोप आहे.
धस पुढे म्हणाले, 'खोक्या हा माझा कार्यकर्ता असेल, पण तो माझ्या घरातील नव्हता. त्याच्यावर अनेक आरोप लावले गेले. एका न्यूज चॅनेल आणि युट्यूब चॅनेलने या प्रकरणाला हवा दिली. त्याच्या घरात हरणाच्या मांसाचा आरोप करण्यात आला. चौकशी अधिकाऱ्यांनी ते मांस उचलून तपासासाठी घेतले आणि टीव्हीवर दाखवले. त्याचबरोबर, त्याच्या मित्राच्या कुटुंबातील महिलांशी गैरवर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्व गोष्टी मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल केल्या गेल्या, ज्यामुळे या प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न झाला.'
ईहेही वाचा: दचा उत्साह मावळला; ना कपडे घेतले, ना सण साजरा केला मस्साजोगचे मुस्लीम बांधव धनंजय देशमुखांच्या गळ्यात पडून रडले
यासोबतच, परळीतील मुंडे गटाने देखील धस यांच्यावर आरोप करत, खोक्याने त्यांना हरणाचे मांस पुरवल्याचा दावा केला. मात्र, धस यांनी या आरोपांना स्पष्टपणे फेटाळले आणि आपण 16 वर्षे माळकरी असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, 'मी प्राणी आणि पक्षीप्रेमी आहे. मी कधीही हरणाच्या शिकारीत सहभागी नव्हतो. पण या संपूर्ण कटामागील हेतू वेगळाच आहे. बिष्णोई समाजात हरणाला देवाचा दर्जा आहे आणि माझ्यावर असे आरोप करून मला त्यांच्या विरोधात उभे करण्याचा डाव आखण्यात आला होता. हा कट इतका गडद होता की माझा खून व्हावा, अशी योजना रचण्यात आली होती.'
राजकीय स्पर्धा इतक्या टोकाला गेली आहे की, आता जीवघेण्या कटांना प्राधान्य दिले जात असल्याचे धस यांनी सूचित केले. . शिरूरमधील परिस्थिती आणि काही राजकीय गटांच्या दादागिरीमुळे लोक पळून जात आहेत, हे देखील त्यांनी ठामपणे मांडले. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास आणि त्याचे राजकीय पडसाद काय उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.