मुंबई: मुंबई पोलिसांचा राजा अशी ओळख असलेल्या वरळी पोलीस कॅम्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या एका कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रविवारी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यामुळे, शिवसैनिक आणि मनसैनिक यांच्यात उत्साह पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी संध्याकाळी सहा वाजता गणेशोत्सवानिमित्त पाद्यपूजन आणि बोधचिन्ह अनावरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात, अरविंद सावंत, सचिन अहिर, सुनील शिंदे, अभिनेता डॉ. सुयश टिळक आणि अभिनेत्री इशा कोप्पीकरही उपस्थित राहाणार आहे. तसेच संदीप देशपांडे, आशिष चेंबुरकर, माजी पोलीस आयुक्त जे. एफ. रिबेरो, सतीश सहानी, एम. एन. सिंग आणि रणजीत शर्माही उपस्थित राहाणार आहेत.
हेही वाचा: 'संस्थेद्वारे होणाऱ्या गैरकारभाराची शासनाने चौकशी करावी' - माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील
विजयी मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू 5 जुलै रोजी एकाच मंचावर आले होते. हा विजयी मेळावा वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे पार पडला होता. यादरम्यान, खासदार सुप्रिया सुळेंनी पुढाकार घेत अमित ठाकरेंना उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आणि आदित्य ठाकरेंना राज ठाकरे यांच्या बाजूला उभं केलं. तेव्हा, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील व्यासपीठावर पुढे येत हातात हात मिळवला. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.