Wednesday, August 20, 2025 11:28:34 AM

विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांची फसवणूक

एआयद्वारे विश्वास नांगरे पाटील यांचा बनावट चेहरा वापरून संभाजीनगरातील निवृत्त अधिकाऱ्याच्या दाम्पत्याची 78.60 लाखांची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा धक्कादायक प्रकार.

विश्वास नांगरे पाटील यांचा ai चेहरा वापरून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 78 लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'आर्टिफिशिअल इंटेलिजन्स'द्वारे खोटा चेहरा बनवून नांगरे पाटील बोलत असल्याचं भासवत छत्रपती संभाजीनगर येथील एका वृद्ध दाम्पत्याला गंडा घालण्यात आला. धक्कादायक म्हणजे पीडित दाम्पत्यापैकी पती हा सेवानिवृत्त सरकारी अधिकारी आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयातून सेवानिवृत्त झालेला छत्रपती संभाजीनगर येथील एक वरिष्ठ अधिकारी आणि त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉलवरुन फसवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा एआय चेहरा वापरुन वृद्ध दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली.

हेही वाचा:धक्कदायक! टीसी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला शाळेच्या व्यवस्थापनाकडून बेदम मारहाण

संबंधित वृद्ध दाम्पत्याला पोलीस अधिकारी बोलत असल्याचं सांगत सायबर गुन्हेगारांनी फोन केला. दहशतवाद्यांच्या खात्यातून तुमच्या बँक खात्यात संशयास्पद 20 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचा बनाव करण्यात आला. दोन ते सात जुलै या काळात सातत्याने फोन करुन त्यांना डिजिटल अरेस्टची भीती घालण्यात आली. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोला, असे सांगत नांगरे पाटलांचा एआय चेहरा वापरत सायबर गुन्हेगाराने दाम्पत्याशी बातचित केली.

सहा दिवसात सायबर गुन्हेगारांनी दाम्पत्याला 78 लाख 60 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. डिजिटल अरेस्ट असा कुठलाही प्रकार बेकायदेशीर असून सामान्य नागरिकांनी या प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केलं आहे.


 



 


 


सम्बन्धित सामग्री