Monday, September 01, 2025 01:10:33 AM

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावणार, अजित पवारांची मोठी घोषणा

दुधात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावणार अजित पवारांची मोठी घोषणा

दूध आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई होणार असल्याची मोठी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक सुधारणा करून भेसळखोरांना चाप लावण्याचा इशारा त्यांनी दिला.

राज्यात काही ठिकाणी दूध व अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळीच्या प्रकारानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अजित पवार यांनी या संदर्भात कठोर भूमिका घेतली.कठोर 

यासंदर्भात विधानभवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले.

हेही वाचा: अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस; कोणत्या महत्त्वाच्या घोषणा झाल्या आणि कोणत्या राहिल्या अपूर्ण?

राज्यात ॲनालॉग चीज हा पदार्थ “ॲनालॉग पनीर” या नावाने विक्री होत असल्याच्या प्रकरणावरही या बैठकीत चर्चा झाली. दूध व तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई केली जाईल. संबंधित प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिले.

हे पाऊल घेतल्यामुळे दूध आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या भेसळखोरांना मोठा दणका बसणार आहे. ग्राहकांच्या आरोग्यास धोका पोहोचवणाऱ्या अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी राज्य सरकार आता अधिक कठोर पावले उचलणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री