विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: 17 जून रोजी श्री क्षेत्र माऊली जन्मस्थान असलेल्या आपेगाव येथील पायी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली 280 किलोमीटरचा प्रवास करून 5 जुलैला दिंडी पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असून कैवल्यमूर्ती विष्णू महाराज कोल्हापूरकर यांच्या आशीर्वादाने सोहळा अविरत चालू आहे. त्र्यंबकपंत यांनी ही परंपरा साडेआठशे वर्षांपूर्वी सुरू केली. 17 जूनला पादुकांचे पूजन करून दिंडीच्या प्रस्थान सोहळ्यास प्रारंभहोणार आहे. त्यानंतर आपेगाव येथे नगर प्रदक्षिणा होणार आहे. परंपरागत पद्धतीने पहिला मुक्काम संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातच होईल तर दुसऱ्या दिवशी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर यांच्या कीर्तनानंतर परतीचा प्रवास सुरू होईल.
18 जागी मुक्काम:
छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांतील बोरगाव, बोधेगाव, दराडे वस्ती, बोरगाव संस्था चकला, नागरेचीवाडी, नाळवंडी, पाटोदा, पारगाव घुमरे, जायभायेवाडी, खर्डा, आंबी, कंडारी, परांडा, भाकचंद धोका, आरण आणि मेंढापूर येथे दिंडीचा मुक्काम होईल.