मुंबई: राज्य सरकारच्या 'लाडकी बहीण' योजनेला मिळत असलेली प्रचंड लोकप्रियता आता फसवणुकीस कारणीभूत ठरतेय. मानखुर्द परिसरात या योजनेच्या नावाखाली तब्बल 65 महिलांच्या नावावर 20 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात स्थानिक महिला व काही वित्तसंस्थेचे कर्मचारी सामील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.
राज्य सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेनुसार, पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. मात्र काही महिलांना कागदपत्रांच्या त्रुटींमुळे योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. याच गैरसोयीचा गैरफायदा घेत आरोपींनी मोबाइल व पहिल्या हप्त्याचे आमिष दाखवून महिलांकडून आधारकार्ड, फोटो व बँक तपशील मिळवले.
यानंतर या महिलांच्या नावावर खासगी वित्तसंस्थांकडून मोबाईल खरेदीसाठी कर्ज घेण्यात आले. कुर्ला व अंधेरीतील मोबाईल दुकानात नेऊन महिलांचे फोटो घेण्यात आले आणि त्यांच्या नावावर घेतलेले आयफोन लगेचच परत काढून घेण्यात आले. त्यांना 2 ते 5 हजार रुपये देऊन हा ‘लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता’ असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकाराची व्याप्ती आणखी मोठी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात सध्या एक महिला व चार ते पाच इतर आरोपींचा समावेश असून, दोघे वित्तसंस्थेचे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिस अधिक तपास करत असून, नागरिकांना अशा प्रकारच्या आमिषांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.