Sunday, August 31, 2025 05:07:53 PM

आयएफएडी (IFAD) पुरस्काराने गौरवलेलं बारीपाडा जगभर झळकलं

एकेकाळी दुर्लक्षित आणि विकासापासून कोसो दूर असलेलं हे गाव, आज तब्बल 78 देशांमधील 'आदर्श गाव' या जागतिक सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर झळकत आहे.

आयएफएडी ifad पुरस्काराने गौरवलेलं बारीपाडा जगभर झळकलं

बारीपाडा: धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात वसलेलं बारीपाडा हे लहानसं आदिवासी गाव आजच्या काळात संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेत आहे. एकेकाळी दुर्लक्षित आणि विकासापासून कोसो दूर असलेलं हे गाव, आज तब्बल 78 देशांमधील 'आदर्श गाव' या जागतिक सर्वेक्षणात दुसऱ्या क्रमांकावर झळकत आहे. ही केवळ बारीपाडाची नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि भारताची अभिमानास्पद गोष्ट आहे.

संपूर्ण बारीपाडा गावाचं रूप बदललं:

बारीपाडा गावाचं यश हे अचानक किंवा सहसा मिळालेलं नाही. या गावाला जगभरात ओळख निर्माण होण्यामागे चैत्राम पवार या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाचं आणि गावकऱ्यांच्या अट्टहासाचं योगदान आहे. स्वतःच्या श्रमदानातून, चिकाटीने आणि एकजुटीने त्यांनी आपल्या गावाचं संपूर्ण रूपच बदलून टाकलं आहे.

आदर्श निर्माण करणारा प्रकल्प ठरला:

आज बारीपाडा हे केवळ स्वच्छ, सुंदर आणि सुशिक्षित गाव म्हणून नाही, तर निसर्गाशी सख्य करत टिकाऊ विकासाचा आदर्श निर्माण करणारा प्रकल्प ठरला आहे. येथील साग, देवखुंबा, पलास, पांगारा, ऐन, कुंभ, मोह, करंद यांसारख्या दुर्मिळ झाडांनी समृद्ध अशी वनसंपदा आहे. या परिसरात पँथर, भारतीय लांडगा, काळा ससा, मंगूस, मॉनिटर सरडा अशा अनेक वन्यप्राण्यांचं संवर्धनही करण्यात आलं आहे. निसर्गाचा समतोल राखतच गावाने आपला आर्थिक विकास घडवून आणला आहे.

आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी यांच्या तर्फे पुरस्कार:

या सर्व कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. या गावाला आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी (International Fund for Agricultural Development) यांच्या तर्फे पुरस्कार मिळवणं हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. हा पुरस्कार म्हणजे बारीपाडाच्या प्रगतीचा जागतिक सन्मान आहे.

इतर गावांसाठी बारीपाडा प्रेरणास्थान:

बारीपाडाची माती सुपीक आहे, पण त्याहीपेक्षा सुपीक आहे येथील लोकांची विचारसरणी. शिक्षण, पाणी व्यवस्थापन, सौरऊर्जा, जैवविविधतेचं संरक्षण, जलसंधारण अशा अनेक बाबतींत बारीपाडा आज इतर गावांसाठी एक प्रेरणास्थान ठरलं आहे. येथे निसर्ग, माणूस आणि गाव यांचा सुंदर समतोल निर्माण करण्यात आलाय. चैत्राम पवार यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी जे स्वप्न पाहिलं, त्यात त्यांनी संपूर्ण गावाला सामावून घेतलं. ना कोणती राजकीय यंत्रणा, ना सरकारी गाजावाजा. केवळ स्वतःच्या कष्टाच्या जोरावर त्यांनी आदर्श निर्माण केला. आज बारीपाडा हे निसर्गस्नेही जीवनशैलीचं आणि सामूहिक विकासाचं मूर्त स्वरूप आहे. हे गाव सांगतं 'विकास हा निसर्गाच्या विरोधात नाही, तर त्याच्या सहवासात घडवता येतो'.


सम्बन्धित सामग्री