भंडाऱ्यात राष्ट्रवादीने पाठ फिरवल्यानंतर गोंदियात भाजपने विजय मिळवला!
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या चारही विषय समित्यांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. भाजपच्या सर्व चारही उमेदवारांनी सभापती पदावर विजय मिळवला, तर मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला पूर्णपणे सभापतीपदापासून दूर ठेवण्यात आले.
ही निवडणूक महायुतीतील अंतर्गत संघर्षाचे प्रतिबिंब असल्याचे बोलले जात आहे. भंडारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र येत भाजपला दूर ठेवले होते. त्याचाच बदला भाजपने गोंदिया जिल्हा परिषदेत घेतला असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच महायुती अंतर्गत बिघाडी निर्माण झाली असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे.
👉👉 हे देखील वाचा : वडिलांच्या आठवणींना गाठीशी बांधून वैभवी देशमुख आज देणार बारावीची परीक्षा
निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना प्रत्येकी 13 मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवारांना तब्बल 39 मते मिळाली. भाजपला मिळालेल्या मतांमध्ये भाजपच्या 26, चाबी संघटनेच्या 4, अपक्षांच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 8 मतांचा समावेश होता.
👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
आज पार पडलेल्या विषय समिती निवडणुकीत मुंडीपार गटाचे डॉ. लक्ष्मण भगत, पिंडकेपार गटाच्या दिपा चंद्रिकापूरे, अपक्ष जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा ढेंगे आणि तिरोडा तालुक्यातील रजनी कुंभरे या चारही उमेदवारांनी विजय मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला बालकल्याण, समाजकल्याण आणि अन्य समित्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे सर्व उमेदवार बिनविरोध विजयी झाले.