कोल्हापूर : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठी भाषिकांच्या सोमवारी होणाऱ्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक पोलिसांनी सीमावर्ती भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. निपाणी पोलिसांनी कोगनोळी आणि दूधगंगा नदी परिसरात विशेष नाकाबंदी लावून वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
कर्नाटक प्रशासनाकडून आज सकाळपासूनच अतिरिक्त पोलिस दल मागवण्यात आले असून, सीमेवर येणाऱ्या-जाणाऱ्या चारचाकी वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाला तपासणीनंतरच पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे.

कर्नाटक सरकारने मराठी भाषिक मेळाव्याला विरोध दर्शवत हा कडेकोट बंदोबस्त केला आहे. महाराष्ट्रातील नेत्यांना या मेळाव्यात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. नाकाबंदीमुळे दोन्ही राज्यांदरम्यानच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मराठी भाषिकांच्या मेळाव्याला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे कर्नाटक प्रशासनाने तणाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. सीमावादाचा मुद्दा अजूनही दोन्ही राज्यांसाठी संवेदनशील आहे.
सीमावर्ती भागातील रहिवाशांमध्येही या नाकाबंदीमुळे नाराजी आहे. मराठी भाषिकांच्या मेळाव्यावर असे निर्बंध आणल्याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे. प्रशासनाने योग्य ती पावले उचलून परिस्थिती नियंत्रणात ठेवावी, अशी मागणी सीमावर्ती भागातील नागरिकांनी केली आहे.