मुंबई: मुंबईतील गजबलेले ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकाजवळ एक कबुतरखाना आहे. गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना हटवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. मात्र, शुक्रवारी रात्री मुंबई महानगरपालिकेचे पथक कबुतरखाना पाडण्यासाठी जेव्हा दादर येथील कबुतरखाना परिसरात दाखल झाले, तेव्हा नागरिकांनी याला जोरदार विरोध केला. या घटनेमुळे, कबुतरखाना परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. तसेच, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस पथक घटनास्थळी दाखल करण्यात आले.
हेही वाचा: Chhtrapati Sambhajinagar: टोमॅटोचा सर्वाधिक दर, पैठणच्या खादगांव येथील शेतकऱ्याला लागली लॉटरी
कबुतरखाना परिसरातील पत्रे आणि इतर वस्तू काढून टाकण्यात आले आहेत. सध्या, कबुतरांना राहण्यासाठी फक्त एकच पिंजरा शिल्लक आहे. यामुळे, मुंबई महानगरपालिका या सर्व गोष्टी कधी काढतील आणि कबुतरखान्या विरोधात निर्णायक कारवाई कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून कबुतरखाना परिसरात कबुतर मोठ्या प्रमाणात येत असल्याने, परिसरात विविध आजार वेगाने पसरत असल्याची माहिती समोर आली होती. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि त्यांच्या पिसांमुळे अनेकांना श्वसनसंबंधित त्रासांना सामोरे जावे लागते. तसेच, हा कबुतरखाना रस्त्याच्या केंद्रस्थानी असल्याने वाहतुकीवरही परिणाम होतो. त्यामुळे, या कबुतरखान्याला हटवण्यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. मात्र, शुक्रवारी जेव्हा पालिकेचे पथक कबुतरखान्याला हटवण्यासाठी दाखल झाले होते, तेव्हा काही नागरिकांनी याला विरोध दर्शवला.