चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरीच फॉन्ट सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी महाराष्ट्रातील राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. 'भारत भेटीमुळे आपण अचंबित झालो. भारताबद्दल मला पूर्वीपासूनच कुतूहल होते. इतकंच नाही तर मी मुंबईबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक पुस्तकांच्या मदतीने वाचन केले होते. मुंबईला वरवर पाहण्याऐवजी मला इथल्या लोकांमध्ये राहून मुंबईची संस्कृती आणि परंपरा अनुभवून घेण्याची इच्छा आहे,' असे चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरीच म्हणाले.
चिलीचे राष्ट्राध्यक्ष बोरीच यांनी इच्छा व्यक्त केली:
'नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भारत-चिलीचा सामायिक आर्थिक भागीदारी करार पार पडला. व्यापार आणि वाणिज्यासोबतच चिली देश भारतासोबत कृषी उद्योग, खनिज संपत्ती आणि खासकरून चित्रपट निर्मितीमध्ये सहकार्य करण्यास इच्छुक आहे,' असे बोरीच यांनी आपली इच्छा व्यक्त केली. भारताच्या चित्रपट उद्योगाला चिलीमध्ये चित्रपट चित्रीकरणासाठीदेखील चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरीच यांनी आमंत्रित केले. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा चित्रपटाचे चित्रीकरण जेव्हा स्पेनमध्ये झाले, त्यानंतर येथील पर्यटनाच्या संख्येत वाढ झाली. तसेच, चिलीमध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत. त्यामुळे इथे चित्रपटांची निर्मिती केल्यामुळे चिली देशाच्या पर्यटनाला चालना मिळेल,' अशी माहिती बोरीच यांनी दिली.
या भेटीदरम्यान, बोरीच यांनी राज्यपालांकडून महाराष्ट्रातील समस्या समजून घेतल्या. त्यासोबतच त्या समस्यांना सोडवण्यासाठी विविध उपाययोजना दिल्या. 'भारत आणि चिली यांच्यामध्ये पर्यटन आणि व्यापाराद्वारे संबंध आणखी मजबूत होतील,'असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. सध्या मुंबई आणि चिलीमध्ये थेट विमानसेवा नाही, परंतु नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यावर यावर विचार होऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.