Thursday, August 21, 2025 12:08:46 AM

Navi Mumbai: ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात सिलेंडरचा स्फोट

ठाणे-बेलापूर मार्गावर असलेल्या ऐरोली रेल्वे स्टेशन बाहेर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

navi mumbai ऐरोली रेल्वे स्टेशन परिसरात सिलेंडरचा स्फोट

कविता लोखंडे. प्रतिनिधी. नवी मुंबई: नुकताच काही दिवसांपूर्वी चर्चगेट रेल्वे स्टेशनमध्ये असलेल्या एका खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये आग लागली होती. अशातच, ठाणे-बेलापूर मार्गावर असलेल्या ऐरोली रेल्वे स्टेशन बाहेर असणाऱ्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे दररोज लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  

नेमकं प्रकरण काय?

ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली रेल्वे स्थानकाबाहेर माईंड स्पेस कंपनी समोर ऐरोली पूर्व आणि पश्चिमेकडे जाण्या येण्यासाठी भुयारी मार्ग आहे. या भुयारी मार्गाच्या बाहेरील ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर रात्रीच्या वेळेला खाद्यपदार्थाच्या गाड्या लागतात. येथील एका चायनीजच्या बंद असणाऱ्या गाडीतील सिलेंडर मध्ये गळती झाल्याने अचानक सिलेंडर ने पेट घेतला आणि काही क्षणातच या सिलेंडरचा स्फोट झाला. 

सिलेंडर मधील वायू गळतीमुळे स्फोटानंतर संपूर्ण गाडीने पेट घेतला. यावेळी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी सामाजिक कार्यकर्ते अमित पद्माकर यांनी तातडीने घटनेची माहिती अग्निशामक दल आणि पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेला अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे.


सम्बन्धित सामग्री